माजलगावच्या आहेर माश्याला जगभरात मागणी !

By Admin | Updated: September 19, 2014 01:01 IST2014-09-19T00:32:36+5:302014-09-19T01:01:35+5:30

प्रताप नलावडे , बीड माजलगावच्या धरणात अगदी क्वचितच सापडणाऱ्या आहेर माश्याच्या औषधी गुणधर्मामुळे या माश्याला देशातच नव्हे तर परदेशातही मागणी आहे.

Maaralgaon's Aureur fish demand worldwide! | माजलगावच्या आहेर माश्याला जगभरात मागणी !

माजलगावच्या आहेर माश्याला जगभरात मागणी !


प्रताप नलावडे , बीड
माजलगावच्या धरणात अगदी क्वचितच सापडणाऱ्या आहेर माश्याच्या औषधी गुणधर्मामुळे या माश्याला देशातच नव्हे तर परदेशातही मागणी आहे. पडेल ती किंमत देऊन याची खरेदी होत असल्याची माहिती या धरणावर मत्समारीचा व्यवसाय करणाऱ्यांनी दिली. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे अनेक गुणधर्म या माश्यामध्ये असल्याचे येथील मत्सव्यावसायिक सांगतात. मत्सबीज सहआयुक्त कार्यालयानेही याला दुजोरा दिला आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा मासेमारीचा व्यवसाय माजलगाव धरणावर चालतो. या धरणात २८ प्रकारचे नैसर्गिक जातीचे मासे सापडतात. मत्सबीज सोडून तयार करण्यात येणारे चार प्रकारचे मासेही धरणात मोठ्या प्रमाणात सापडतात. नैसर्गिक जातीतीलआहेर नावाच्या माश्याला खूप मोठी मागणी आहे. या धरणातील मासे परदेशातही पाठविले जातात. या धरणात कटला, रऊ, मिरगल, सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प, सायपरनस आदी जातीचे मासे मुबलक प्रमाणात मिळतात. माजलगावमधून हे मासे स्थानिक बाजारात तर जातातच परंतु मुंबईच्या काही एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनाही हे मासे पुरविले जातात. त्यामुळे माजलगाव धरणातील मासा आता परदेशातही जावू लागला आहे.
आहेर जातीचा मासा हा नैसर्गिक जातीमधील असून तो देशभरात खूपच दुर्मिळ समजला जातो. अनेक ठिकाणी आता नैसर्गिक जातीचे मासेही सापडत नाहीत. आहेर नावाचा मासा हा सध्या केवळ माजलगाव धरणातच सापडतो. त्याचे प्रमाण इतके अल्प आहे की गेल्या वर्षभरात केवळ तीनच मासे मत्सव्यवसायिकांना सापडले. या माश्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे डॉ. उध्दव नाईकनवरे यांनी सांगितले. त्यामुळे मासे परदेशात पाठविणाऱ्या मुंबईतील काही कंपन्यांकडूनही या माश्यासाठी खास मागणी होते. त्याची किंमत अगदी दोन हजार रूपयांपासून दहा हजार रूपयांपर्यंत मिळते. परदेशातूनही या माशाला मागणी सातत्याने होत असते. मासे एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या माजलगावच्या मत्सव्यावसायिकांना आहेर मासा त्यांच्याकडे पाठवावा, यासाठी नेहमीच पाठपुरावा करीत असतात, असेही येथील मत्सव्यावसायिकांचे म्हणणे आहे.
अनेकदा हा मासा दुर्मिळ असल्याने त्याला पकडल्यानंतर त्याच्या पाठीवर पीठ चोळून त्या पीठाच्या गोळ्या तयार केल्या जातात आणि त्याला पुन्हा पाण्यात सोडून दिले जाते. या गोळ्यांच्या सेवनाने अनेक रोगांपासून दूर राहता येते, असेही त्यांनी सांगितले.
आहेरचा आकार सापासारखा
आहेर माश्याचा आकार सापासारखा असतो आणि तो नेहमी तळाला राहणे पसंत करतो. नैसर्गिक पध्दतीने तयार होणाऱ्या या माश्याचे मत्सबीज नसल्याने तो दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे. मत्सबीज आणि मत्सविकास कार्यालयाकडून या दुर्मिळ जातीच्या माश्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत.
दररोज सात टन मासे
माजलगाव धरणात वर्षभर साधारणपणे सहा ते सात टन मासे दररोज सापडतात. यापैकी साधारणपणे एक टन मासे निर्यातीसाठी मुंबई, कोलकत्ता, हैद्राबाद, आणि आसाममध्ये पाठविण्यात येतात. बर्फात पॅकींग करून माजलगावहून परभणी जिल्ह्यातील पुर्णा रेल्वे स्थानकावर हे मासे पोहोचविले जातात. तेथून ते रेल्वेने पाठविण्यात येतात. कटला, मरळ, वाम, मोठा आणि छोटा झिंगा, शिंगाडा या जातीच्या माश्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

Web Title: Maaralgaon's Aureur fish demand worldwide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.