‘निम्न तेरणात’ तरंगते विद्युत पंप बसणार
By Admin | Updated: April 16, 2016 00:14 IST2016-04-15T23:58:11+5:302016-04-16T00:14:11+5:30
उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याचा मृतसाठा राहिला आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी

‘निम्न तेरणात’ तरंगते विद्युत पंप बसणार
प्रशासकीय मान्यता : उमरगा पालिकेचा निर्णय
उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याचा मृतसाठा राहिला आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी याच प्रकल्पातील मृतसाठ्यात तरंगते विद्युत पंप पाणी योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय उमरगा पालिकेने घेतला आहे़ २१ लाखांच्या या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़
उमरगा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी तेवीस कोटी खर्च करून माकणी प्रकल्पातील पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे़ गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याने माकणी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या जेमतेम पाण्यावर शहरासह प्रकल्प परिसरातील अनेक गावांची तहान भागत आहे़ सध्या या प्रकल्पात केवळ ३़५ दलघमी पाणीसाठा असून, हा पाणीसाठाही मृतावस्थेत आहे़ या उपलब्ध पाण्यावर निलंगा शहर पाणीपुरवठा, भूकंपग्रस्त ५२ गावे योजना, औसा तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा केला जात आहे़ लातूर शहरासाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ ही परिस्थिती पाहता पालिकेला प्रशासनाच्या सूचनेनुसार पाणीकपात करावी लगली होती़
शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता शहरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे़ शहरातील साईनगर, गणेश नगर, विष्णूपुरी, औटी नगर, डिग्गी रोड आदी भागात शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे़ शहराला दररोज साधारणत: ३० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे़ माकणी प्रकल्पातून सध्या २० लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे़ हे पाणी आठ दिवसाआड शहराला पुरवठा केले जाते़ उपलब्ध पाणी अपुरे पडत असल्याने विकतच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे़ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी माकणी प्रकल्प हा एकमेव पर्याय आहे़ त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेने मागील आठ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत संभाव्य पाणीपुरवठा योजनेसाठी तरंगत्या विद्युत पंप योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता़ या प्रस्तावास विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले़
अशी आहे योजना : २१ लाख ५७ हजारांचा खर्च अपेक्षित
माकणी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला असून, सध्या केवळ मृतसाठा उपलब्ध आहे़ या प्रकल्पात मागील दोन वर्षापूर्वी पालिकेने विहीर उभारली आहे़ या विहिरीपासून प्रकल्पापर्यंत ८०० मीटरची एनडीपी पाईपलाईन करण्यात येणार आहे़ जोत्याखालील डबक्यात साचलेल्या पाण्यावर दोन तरंगते विद्युत पंप बसवून पाईपलाईनद्वारे हे पाणी विहिरीत घेतले जाणार आहे़ २१ लाख ५७ हजार ४९७ रूपये खर्च अपेक्षित असलेल्या या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच हे काम सुरू होणार आहे़