जमिनीतील कर्बाने गाठला निचांक

By Admin | Updated: August 31, 2014 01:11 IST2014-08-31T00:30:04+5:302014-08-31T01:11:01+5:30

जगदीश पिंगळे , बीड मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे.

Low reach in the ground curb | जमिनीतील कर्बाने गाठला निचांक

जमिनीतील कर्बाने गाठला निचांक


जगदीश पिंगळे , बीड
मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी तिला विश्रांती देणे अनेकदा गरजेचे असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि जमिनीतील अन्नद्रवाचे अतिरेकी शोषण वाढल्यामुळे कर्बाचे प्रमाण ०.३ ते ०.५ असे झाले आहे. कर्बाला जर जमिनीचा श्वास म्हटले तर ती जमिन आता मृत घोषीत करावी की काय अशी पाळी आली आहे, अशी प्रतिक्रीया पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक वर्षे काम करणारे पर्यावरणवादी विचारवंत सय्यद एस.बी.यांनी दिली आहे.
मराठवाड्यात गेल्या पंधरा वर्षात खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर वाढले. उसाचे क्षेत्र वाढले. त्या तुलनेत जमिनीत पाणी झिरपविण्याचे प्रमाण कमी झाले, असे मराठवाडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालीदास आपेट यांनी सांगितले. सध्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ८५८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.
पुणे येथे गुण नियंत्रण विभागाचे संचालक असलेले जयंत देशमुख म्हणाले, मराठवाड्यात ४० टक्के जमीन हलकी आहे. नगदी पिकांच्या रेलचेलीच्या काळात आलटून पालटून जमिनीच्या पट्यांना विश्रांती देणे गरजेचे आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृद संधारण विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. डी. पाटील म्हणाले की माती परीक्षण सध्या महत्वाचे झाले आहे. मृद साक्षरता ही साक्षरतेच्या मोहिमेतील नवीन संकल्पना नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी आत्मसात करावी. तरच जमिनीची सुपिकता राहील. गेल्या चाळीस वर्षापासून जमिनीची सेंद्रीय घटकांची मात्रा कमी कमी होत आहे.
सध्या हे प्रमाण ०.३ ते०.५ आहे. जमिनीच्या एक हेक्टर तुकड्यातून आपण १८० किलो नत्र, पालष, स्फुरद, गंधक, पिकाद्वारे काढीत असतो आणि त्या तुलनेत फक्त १२० किलो सेंद्रीय खत देतो.
जमिनीत ‘मल्टी डिफेसेंन्सी’ होत आहे, असे ही डॉ. पाटील म्हणाले. लोह , जस्त यांची कमतरता हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे एकूण जमिनीची सुपिकता सध्या सलाईनवर आहे, अशी चिंता मान्यवरांनी व्यक्त केली. जमिनितील कर्ब वाढविण्यासाठी व्यापक स्वरुपात प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. जमिनितील कर्ब वाढला तरच सुपिकता वाढेल परिणामी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खताचा वापर करणे काळाची गरज बनली आहे, असे झाले तरच जमिनितील कर्ब वाढू शकतो.

Web Title: Low reach in the ground curb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.