माझ्या दोन मुलींसारखेच मतदारसंघावर प्रेम-अशोकराव
By Admin | Updated: September 28, 2014 00:10 IST2014-09-28T00:04:47+5:302014-09-28T00:10:00+5:30
भोकर : चार महिन्यांपूर्वी देशात वेगळे घडले़ पण जिल्ह्यातील जनता काँग्रेससोबत राहिली़ तुमचं प्रेम विसरता येणार नाही़ सत्ता असो वा नसो, मी तुमच्यासोबत आहे़

माझ्या दोन मुलींसारखेच मतदारसंघावर प्रेम-अशोकराव
भोकर : चार महिन्यांपूर्वी देशात वेगळे घडले़ पण जिल्ह्यातील जनता काँग्रेससोबत राहिली़ तुमचं प्रेम विसरता येणार नाही़ सत्ता असो वा नसो, मी तुमच्यासोबत आहे़ आपले नाते दिवंगत नेते डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्यापासून आहे़ ते मी घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे़ सदैव या मतदारसंघावर माझ्या दोन मुलींसारखे प्रेम केले, असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी येथे केले़
भोकर मतदारसंघातून अमिता चव्हाण यांची उमेदवारी दाखल केल्यानंतर काँगे्रसने भव्य रॅली काढली़ त्यानंतर झालेल्या सभेत खा़ चव्हाण बोलत होते़ ते म्हणाले, मागील दोन दिवसांपासून उमेदवारीबाबत चर्चा सुरू होती़ सर्वांच्या सहमतीने अमिता चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली़ आज मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यात अनेकजण इकडून तिकडे उड्या मारत आहेत़ दस्ती बदलली तरी माणसे तेच आहेत़ भाषणे मोठी करतात, मात्र त्यांच्या कामाचा पत्ता नसतो़ याउलट काँग्रेस समाजातील वाडी-तांड्यासह लहान घटकांना सोबत घेवून चालते़ अच्छे दिन बोलण्याने येत नाहीत़ त्यासाठी कामे उभी करावी लागतात़ इथल्या तरुणांच्या मनात काँग्रेसचा पंजा आहे़ तरूण काँग्रेससोबत आहेत़ येणारे १५ दिवस महत्त्वाचे आहेत़ भूलथापांना बळी न पडता काँग्रेससोबत रहा, खासदार तुमचाच आहे, आमदारही तुमचाच राहू द्या़
माझ्यावर ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप झाला़ त्यातील सत्य सर्वांसमोर आले़ जनतेचे प्रेम इतके मोठे आहे, की कुठल्या तरी मशीन बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ विरोधकांचा डाव या प्रकरणात समोर आला आहे़ यावेळी बापूराव गजभारे म्हणाले, सर्व जाती-धर्माला काँग्रेस सोबत घेवून जाणारा पक्ष आहे़ अशोकरावांच्या रुपाने मराठवाड्याला मोठे नेतृत्व लाभले आहे़ तेच भावी मुख्यमंत्री आहेत़
यावेळी आ़ अमरनाथ राजूरकर, जि़प़अध्यक्षा मंगला गुंडिले, बापूराव गजभारे, गणपतराव तिडके, शंकरराव बारडकर, अप्पाराव सोमठाणकर, पप्पू कोंढेकर, संजय लहानकर, प्रकाशराव भोसीकर, गोविंद पाटील गौड, मंगाराणी अंबुलगेकर, माधवराव पाटील मातूळकर, गोविंद नागेलीकर, नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, बालासाहेब रावणगावकर यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन भीमराव दुधारे यांनी केले़ सभेमध्ये विविध पक्षातील ५० तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ (वार्ताहर)
अमिता चव्हाण म्हणाल्या, पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी देवून जनतेच्या सेवेची संधी दिली़ काँग्रेसला मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे़ इतर पक्षाचे उमेदवार आम्हाला नवीन नाहीत़ वेळ कमी आहे़ आपण सर्वांनी कामाला लागावे़ काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले़
अमिता चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली़ रॅलीत आजूबाजूच्या गावातील मतदार सहभागी झाले़