प्रेम हा तर माझ्या अवघ्या आयुष्याचा सारांश!
By Admin | Updated: February 14, 2015 00:12 IST2015-02-13T23:58:25+5:302015-02-14T00:12:07+5:30
औरंगाबाद : भाषा, धर्म, देशाच्या भिंती ओलांडून संवादाचे पूल बांधणारी संवेदना. ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हा प्रश्न आजवर अनेक कवी-कलावंतांना पडला, पडत राहील.

प्रेम हा तर माझ्या अवघ्या आयुष्याचा सारांश!
औरंगाबाद : प्रेम, मर्त्य मानवाच्या इतिहासात अमर बनून राहिलेली एकमेव आदिम भावना! भाषा, धर्म, देशाच्या भिंती ओलांडून संवादाचे पूल बांधणारी संवेदना. ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हा प्रश्न आजवर अनेक कवी-कलावंतांना पडला, पडत राहील. गजल आणि नज्मच्या तरल शब्दकळेतून हे रंग कागदावर साकारणारे शायर जनाब बशर नवाज यांनी प्रेमदिनानिमित्त मांडलेले हे नजाकतदार हृद्यगत.....
‘लाख चाहत सही लेकीन मुझे मंजूर नही
मेरे बातों में तेरे नाम की खुशबू आए...’
उर्दू भाषेतील प्रेम हे असे आहे. मुळात उर्दू, जिला रेख्ता असेही म्हणतात; ती अतिशय अदबी, सौम्य, संयत भाषा आहे आणि प्रेमासारखी हळुवार भावना तर इथे अजूनच तहजीबी अंदाज घेऊन व्यक्त केली जाते. उर्दू जनसामान्यांमध्ये ‘मुहब्बत की जुबान’ म्हणूनच ओळखली जाते. आपली संस्कृतीही मुळात प्रेमाचे उदात्त, भव्य दर्शन घडविणारी अशीच आहे. काही मिळविण्याच्या इच्छेपेक्षा समोरच्याची ओंजळ भरण्याची भावना घेऊन येणारे प्रेम कवी म्हणून मला अधिक मोहवते. प्रख्यात शायर जिगर मुरादाबादी म्हणतात....
इक लफ्जे मोहब्बत का अदना सा फसाना है
सिमटे तो दिले आशिक फैले तो जमाना है
संत ज्ञानेश्वर ‘भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे’ असे लिहीत विश्वाच्या कल्याणाचे पसायदान मागतात. भाषा आणि ‘अंदाजे बयां’ वेगळा असेलही. मात्र, एका प्रिय व्यक्तीच्या देहमनात अडकलेली प्रेमभावना अवघ्या जगावर पांघरण्याइतकी विशाल, अथांग बनविण्याचेच आवाहन हे दोन्ही महाकवी करतात. एकावर केलेले प्रेम तुम्हाला अवघ्या जगाशी जिव्हाळ्याने वागायला प्रवृत्त करते. सुफियाना इश्क ही तर ज्येष्ठ शायर सिराज, मीर तकी मीर यांच्यापासून अगदी नव्या काळातील शायरांपर्यंत येऊन पोहोचणारी संकल्पना आहे. दगडाच्या सगुण साकार मूर्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकार ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सामान्य माणूस भक्तीतून करतो. हाच यत्न शायर शब्दांतून साधतो. यातून नश्वर माणूसही सर्व शक्तिमान ईश्वराच्या बाजूला विराजमान होतो. मीर म्हणतो ना,
‘परस्तिश की आदत के ऐ बुत तुझे, नजर में सभोकी खुदा कर चले’
मात्र, प्रेमाचे वस्तुकरण शायरीला आणि अर्थातच मलाही मुळीच मंजूर नाही. मेला जमाके आशिकी नही की जाती. प्रेम हे असं गुपित आहे, जे स्वत:ला सांगतानाही आतून मोहरून, थरारून जावे. मोहब्बत को इतना आम, आसान ना बनाओ.
इस ‘व्हॅलेंटाईन डे’ के किमती तोहफे, बाजार की चकाचौध, दुकानों की नुमाईश इस में मुहब्बत किसी भटके हुए मासूम बच्चे की तरह खो गई है जेसे. कभी सोचाही नही अपना पराया मैने जिसको चाहा है उसे टूटके चाहा मैने हे एक शायर म्हणून माझे मनोगत आहे. माझ्या जगण्याचा सारांशच प्रेम आहे मुळी!