भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 07:09 PM2020-03-13T19:09:46+5:302020-03-13T19:13:21+5:30

या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 

Lottery to BJP's Karad; Shive sena's Khaire upset over Rajya Sabha Candidature | भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट

भाजपच्या कराड यांना लॉटरी; सेनेच्या खैरेंचा पत्ता कट

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपकडून निष्ठावंताला न्याय उमेदवारी न मिळाल्याने खैरे नाराज

औरंगाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने त्यांना आश्चर्यकारकरीत्या लॉटरी लागली आहे. तर शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा पक्ष प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यामुळे पत्ता कट झाला आहे. या सगळ्या प्रकरणात खैरे प्रचंड उद्विग्न झाले असून, त्यांनी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. कराड म्हणाले, सामान्य कार्यकर्त्याचा पक्षाने विचार केल्यामुळे आनंद झाला आहे. शिवसेनेला ही मोठी चपराक आहे. बुधवारी माझा बायोडाटा पक्षाने मागविला होता. परंतु अचानक उमेदवारी जाहीर होईल, असे वाटले नव्हते. पक्षनिष्ठेमुळे हे सगळे शक्य झाले आहे. शिवसेनेचे सात आमदार जिल्ह्यात असले तरी खासदार एमआयएमचा आहे. गेल्या लोकसभेत ३ ते ४ हजार मतांनी खैरेंचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मागील ३० वर्षांत पक्षासाठी केलेले काम पक्ष नेतृत्व विचारात घेईल, असे त्यांना वाटले होते. परंतु प्रियांका चतुर्वेदी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यसभा सदस्यत्व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १३ मार्च अंतिम तारीख आहे. २६ मार्चला निवडणूक होणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्यामुळे प्रियांकांना उमेदवारी
उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी खा.खैरे म्हणाले, आज सकाळपर्यंत वाटत होते की, पक्षाकडून माझ्या नावाचा विचार राज्यसभा सदस्यत्वासाठी होईल. परंतु ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांचे नाव पुढे आल्यामुळे मन उद्विग्न झाले आहे. निष्ठावंताला न्याय मिळेल असे वाटले होते. परंतु पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. आता यापुढे आपण काय बोलणार.
माझ्यासारख्यावर जर अन्याय होत असेल तर इतर सामान्य कार्यकर्त्यांनी काय करावे, असा प्रश्न आहे. चतुर्वेदी या काँग्रेसमध्ये होत्या. त्यापूर्वी त्या गुरुदास कामत यांच्या समर्थक होत्या. त्यानंतर खा.राहुल गांधी यांच्याकडे गेल्या. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे फळ त्यांना मिळाले. याच शहरात आजवर जे काही सांप्रदायिक वातावरण निर्माण झाले, त्या प्रत्येक वेळी मी धावून गेलेलो आहे. त्यामुळे राज्यसभेत का होईना परंतु हिंदुत्वाच्या मुद्यावर मला बोलता आले असते. मला उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच तिकडे भाजपने डाव खेळला, त्यांनी डॉ.कराड यांना उमेदवारी देऊन पक्षाला बळ दिले. माझी पण ताकद आहे, ती येणाऱ्या काळात दिसेलच. 

Web Title: Lottery to BJP's Karad; Shive sena's Khaire upset over Rajya Sabha Candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.