ऋणानुबंधाच्या जुळल्या गाठी

By Admin | Updated: September 23, 2014 01:36 IST2014-09-23T00:34:56+5:302014-09-23T01:36:36+5:30

प्रताप नलावडे , बीड एकाच पक्षात राहूनही एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण करीत पारंपारिक वैर जपणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नेत्यांचे ‘शिवछत्र’वर रविवारी मनोमिलन झाले.

Lots of matching roles | ऋणानुबंधाच्या जुळल्या गाठी

ऋणानुबंधाच्या जुळल्या गाठी


प्रताप नलावडे , बीड
एकाच पक्षात राहूनही एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण करीत पारंपारिक वैर जपणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नेत्यांचे ‘शिवछत्र’वर रविवारी मनोमिलन झाले. गेली अनेक वर्षांपासून एकमेकांचा उंबरठाही न ओलांडलेल्या या सगळ्यांनी अखेर अमरसिंह पंडित यांच्या ‘शिवछत्र’चा उबंरठा ओलांडत एकमेकांची गळाभेट घेतली आणि एकमेकांच्या हातात हात घालून यापुढे राजकीय वाटचाल करण्याचे निश्चित झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणातील एका वेगळ्या पर्वाची सुरूवात झाल्याची चर्चा होत आहे.
आ. अमरसिंह पंडित यांच्या ‘शिवछत्र’ या निवासस्थानी रविवारी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, गेवराईचे आ़ बदामराव पंडित, आणि मोहनराव जगताप हे सर्वजण एकत्र आले आणि पारंपरिक राजकीय वैराला मुठमाती देत एकदिलाने कामाला सुरूवात केली. यावेळी राज्यमंत्री सुरेश धसही उपस्थित होते. राष्ट्रवादीत नेते मंडळीत असलेले मतभेद या निमित्ताने संपुष्टात आल्याचे दिसू लागले आहे. अमरसिंह पंडित यांचे कडवे विरोधक बदामराव यांनी निवासस्थानी आल्यानंतर पहिल्यांदा आपले काका शिवाजीराव पंडित यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री क्षीरसागर यांनीही विजयसिंह यांना शुभेच्छा दिल्या. याचवेळी त्यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीवरही एकमताने शिक्कामोर्तब केले.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे भलेही वर्चस्व असले तरी एका नेत्याचे दुसऱ्या नेत्याशी पटत नाही, अशीच काहीशी परिस्थिती आहे. प्रत्येकाच्या वेगळ्या चुली असल्यामुळे राष्ट्रवादीला जिल्ह्याच्या राजकारणात संघटितपणे दबदबा आजवर निर्माण करता आला नाही.
राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित या चुलत भावांमधून आजवर आडवा विस्तव जात नव्हता. गेवराईत एकमेकांच्या विरोधात त्यांनी टोकाची भूमिका बजावली आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित यांच्यामधील वाद तर पारंपारिक राजकीय वैर म्हणावा लागेल.
बदामराव आणि अमरसिंह यांच्यातील मतभेदाची सुरूवात १९९१ च्या पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून झाली. गेवराई पंचायत समितीच्या सभापतीपदावर बदामराव पंडित यांनी हक्क सांगितला असतानाही शिवाजीराव पंडित यांनी पुतण्याला डावलत मुलगा अमरसिंह यांना सभापतीपद दिले. यावरून पडलेली ठिणगी इतकी विकोपाला गेली की बदामराव यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत दस्तूरखुद्द शिवाजीराव पंडित यांच्या विरोधातच शड्डू ठोकले आणि त्यांना पराभूतही केले. यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अमरसिंह यांनाही पराभूत केले. दरम्यानच्या काळात या दोघांमधील राजकीय वैर वाढतच गेले. हे दोघेही सध्या राष्ट्रवादीत एकाच पक्षात कार्यरत असले तरी दोघांचेही गेवराईत दोन गट सक्रिय होते.
गत लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पंडितांना शरद पवार यांनी एकाच व्यासपीठावर आणत मतभेद संपुष्टात आल्याचे संकेत देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या सभेनंतर त्या निवडणुकीच्या प्रचारात हे दोघेही पुन्हा एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे केवळ पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिल्याने तांत्रिकदृष्ट्या एकत्र आलेल्या दोन्ही पंडितांचे मनोमिलन काही झालेच नाही.
पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यात आणि अमरसिंह पंडित यांच्यातही राजकीय वैर अनेक वर्षांपासून सुरूच होते. १९९० च्या निवडणुकीत यापूर्वी एकदा क्षीरसागर आणि पंडित एकत्र आले होते. परंतु त्यानंतर पुन्हा त्यांच्यातील राजकीय वैर सुरूच राहिले आणि आजवर ते कायम होते. अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होण्यापूर्वी क्षीरसागर यांच्या निवासस्थानी पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमरसिंह यांनी, आपण कोणाच्या बंगल्यावर बैठकीसाठी जात नाही, असे म्हणत आपल्या सदस्यांसह थेट जिल्हा परिषदेत जाणे पसंत केले होते. २००१ मध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगराध्यक्ष झाल्यानंतर क्षीरसागरांना राजकीय विरोध करणाऱ्या पंडितांच्या याच ‘शिवछत्र’समोर फटाके फोडून क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. शिवाजीराव पंडित यांनीही एकदा केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव केल्याशिवाय डोक्यावर टोपी घालणार नसल्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती.
राजकारणात नेहमीच एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या नेत्यांनी बेरजेचे राजकारण करीत जिल्हा परिषदेच्या निमित्ताने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या सर्वांचे ‘शिवछत्र’ वर मनोमिलन झाले.
सध्याची बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील धुसफूस एकमेकांसाठी घातक असल्याचीच चर्चा होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जिल्ह्यात निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि आमदार पंकजा पालवे यांनी भाजपाची सूत्रे हाती घेत राजकीय समीकरणे जुळविण्यास केलेली सुरूवात राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय बनली होती. त्यातच राष्ट्रवादीचे केज आणि माजलगाव मतदारसंघातील एक वजनदार नेते रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात केलेला प्रवेश या नेत्यांना धक्का देणाराच होता. नेमकी याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि भाजपाची जि.प.मध्ये वाढलेली ताकद सत्तांतराचे संकेत देऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर या नेत्यांनी एकत्रित येत नशिबाने का होईना परंतु सत्ता मिळविली. आता राष्ट्रवादीच्या या मनोमिलनाचा विधानसभा निवडणुकीत नेमका काय परिणाम होणार आहे, हे पाहणेही पुढील काळात रंजक ठरणार आहे.

Web Title: Lots of matching roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.