थकबाकीचा डोंगर गेला चक्क गगनावरी
By Admin | Updated: July 22, 2016 00:45 IST2016-07-22T00:05:07+5:302016-07-22T00:45:21+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील सुमारे सव्वा लाखांहून अधिक मालमत्ताकरधारकांकडे ७५ कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे.

थकबाकीचा डोंगर गेला चक्क गगनावरी
औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील सुमारे सव्वा लाखांहून अधिक मालमत्ताकरधारकांकडे ७५ कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. थकबाकीचा डोंगर आभाळी गेला असून, थकबाकीच्या वसुलीसाठी हतबल झालेल्या सत्ताधारी आणि प्रशासनाने आजवर केलेले सर्व उपाय अपयशी ठरले आहेत. १ लाख ३७ हजार मालमत्ताधारकांकडे ही थकबाकी आहे.
पोलिसांसमोर उभे करण्याची धमकी देणे, घरातील स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देणे, यासारखे उपाय फोल ठरल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाने संयुक्तपणे प्रभागनिहाय कर अदालत घेण्यास गुरुवारपासून सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या अदालतीमध्ये ८९ पैकी फक्त ३८ करदात्यांनी हजेरी लावली. उपस्थितांनी करमूल्यांकनाच्या तक्रारी करून करअदालतीतून काढता पाय घेतला. आ.सुभाष झांबड, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याही तक्रारी आहेत. त्यांच्या तक्रारींवरून मालमत्तांची पाहणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त बकोरिया यांनी सांगितले.
महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, गटनेते राजू वैद्य, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत अदालत घेण्यात आली.
महापौर तुपे म्हणाले, करदात्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. करांप्रकरणी, मूल्यांकनाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी नागरिकांची घरे पाडली गेली आहेत. त्यांना बेहिशोबी कर लागला आहे. २५ ते ५० टक्के कर भरण्यास नागरिक तयार झाले आहेत. ४ कोटी ५३ लाख रुपयांच्या कर थकबाकीसाठी ८९ नागरिकांना आज बोलावण्यात आले होते. किती दिवस ही करअदालत चालणार, १ लाख ३१ हजार करदात्यांकडे बाकी आहे. यावर आयुक्त म्हणाले, सध्या झोननिहाय नियोजन केले आहे. नवीन मालमत्तांना मूल्यांकन करण्याचा प्रयत्न राहील.