‘एसटी’ चा तोटा कोटीच्या घरात
By Admin | Updated: September 14, 2014 23:36 IST2014-09-14T23:32:44+5:302014-09-14T23:36:42+5:30
नांदेड : एसटी महामंडळाच्या स्थानकावरूनच खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि काळीपिवळी चालक प्रवासी पळवत असून त्यामुळे एसटीचे कोट्यवधींचे उत्पन्न खाजगी वाहतूकदारांच्या घशात जात आहे़

‘एसटी’ चा तोटा कोटीच्या घरात
नांदेड : एसटी महामंडळाच्या स्थानकावरूनच खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि काळीपिवळी चालक प्रवासी पळवत असून त्यामुळे एसटीचे कोट्यवधींचे उत्पन्न खाजगी वाहतूकदारांच्या घशात जात आहे़
बसस्थानकापासून शंभर मीटर अंतरावर खाजगी बसेस, काळीपिवळी वाहने उभी करू नयेत, तसेच स्थानकात येवून प्रवासी घेवून जाणाऱ्या एजंटावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत़ मात्र नांदेडसह जिल्ह्यातील अर्धापूर, नायगाव, देगलूर, बिलोली, कंधार, लोहा, किनवट, भोकर आदी बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या काळीपिवळीच्या एजंटला कोणताही अटकाव केला जात नसल्याचे चित्र दिसते़ एजंट आणि काळीपिवळी चालकांवर बसस्थानकातील पोलिस, नियंत्रक आणि आरटीओचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते़ बसस्थानक आणि परिसरात प्रवाशांना पकडून एजंट त्यांना कमी भाड्याचे आमिष दाखवून खाजगी बस अथवा काळीपिवळीने प्रवास करण्यास भाग पाडतात़
खाजगी वाहतुकीमुळे राज्यात एसटीचे जवळपास ७०० कोटींचे नुकसान होत असल्याचा आरोप मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेनी केला आहे़ खाजगी वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय ८ जानेवारी २००२ रोजी औरंगाबाद खंडपीठाने दिला होता़ परंतु वाढती खाजगी वाहतूक पाहून या निर्णयाचा कुठेच अंमल होत नाही़ एसटीचे जिल्ह्यात दर महिन्याला जवळपास १ कोटीचे उत्पन्न बुडते़ तसेच एसटीचे काही चालक वाहकांचा हलगर्जी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठी धोरणाचा फटका उत्पन्नाला बसतो़ जिल्ह्यातील नांदेड - अर्धापूर- हिंगोली, नांदेड - वारंगा- हदगाव, नांदेड - भोकर- किनवट, नांदेड- नर्सी-नायगाव- देगलूर, नांदेड- बिलोली, नांदेड- पूर्णा, नांदेड- लोहा आणि कंधार या मार्गावर खाजगी बस तसेच काळीपिवळी तर नांदेड- वसमत आणि पूर्णा मार्गावर आॅटो मोठ्या प्रमाणावर धावतात़ (प्रतिनिधी)