एक ‘तोटा’ करी आयुष्याचा घाटा !

By Admin | Updated: May 31, 2014 00:56 IST2014-05-31T00:46:10+5:302014-05-31T00:56:15+5:30

व्यंकटेश वैष्णव/ संजय तिपाले, बीड तंबाखूचे व्यसन आता जणू सर्वमान्यच झाले आहे़ कारण शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच खिशात तंबाखूने जागा मिळविली आहे़

A 'loss' curse loss of life! | एक ‘तोटा’ करी आयुष्याचा घाटा !

एक ‘तोटा’ करी आयुष्याचा घाटा !

व्यंकटेश वैष्णव/ संजय तिपाले, बीड तंबाखूचे व्यसन आता जणू सर्वमान्यच झाले आहे़ कारण शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच खिशात तंबाखूने जागा मिळविली आहे़ तंबाखुमुळे सेवनामुळे होणारे दुष्परिणाम माहित असताना देखील राजरोस हातावर तंबाखू चोळून ती तोंडात टाकणारे जागोजागी पहायला मिळतात़ चार ते सहा रुपये इतकी किंमत असलेल्या या तंबाखूचे अर्थकारण तसे ठळकपणे दिसत नाही; पण जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या खरेदी- विक्रतून महिन्याकाठी सुमारे २५ कोटी रूपयांची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा़ दंतरोग तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, १८ ते २५ वयोगटातील ४० टक्के तरूण केवळ ‘एन्जॉय’ म्हणून सिगारेट, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात़ ताण-तणाव असल्याने २० टक्के तर निव्वळ नैराश्य आल्याने ४० टक्के तरूण व्यसनाच्या आहारी जातात़ आरोग्य विभागाच्याच सर्व्हेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे़ ओठावर मिसरूड देखील न फुटलेले तरूण व्यसनात अडकलेले असल्याचे पहावयास मिळत आहे़ एन्जॉय म्हणून होणारी व्यसनाची सुरुवात पुढे आयुष्याची धूळधाण करते; पण तंबाखू, विडी, सिगारेटची सवय काही सुटत नाही, ही वस्तूस्थिती आहे़ सिगारेट किंवा तंंबाखूची तल्लफ एखाद्या दिवशी मिळाली नाही तर तरूणांमध्ये चिडचिड वाढते़ परिणामी व्यसनासाठी पैसे कमी पडल्यामुळे तरुणांची पाऊले गुन्हेगारीकडे वळू लागतात़ तरूण वयातील मुलांना व्यसनाची सवय जडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपल्या पाल्याचे व्यसन सोडविण्यासाठी पालक वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. आपला मुलगा अथवा मुलगी यांचे मित्र कोण आहेत? मुलं रात्री किती वाजता घरी येतात? यावर बारकाईने लक्ष ठेवून धामधूम न करता मुलांना दुष्परिणामांची जाणीव करून दिल्यास मुलं व्यसनापासून दूर राहू शकतात, असे प्रा़ शिवानंद क्षीरसागर यांनी सांगितले़ काय आहेत व्यसनांची कारणे? प्रत्येक पालकाला वाटते की, आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावे. माता- पित्यांच्या अपेक्षेचे ओझे मुलांवर असते. मग अपेक्षित यश मिळाले नाही तर मुलांमध्ये नैराश्य येते. घरातील मंडळीकडून दुरावा निर्माण होतो. याचाच परिणाम म्हणून तरूण व्यसनाकडे वळतात, असे चित्र आहे. ‘पॉकेटमनी’ चा हिशेब नाही... आज प्रत्येक तरूण मुलाचे आई-बाबा त्याला पॉकेटमनी देतात. तशी ‘फॅशन’ च झालेली आहे. जे आई-बाबा मुलांना पॉकेटमनी देत नाहीत त्यांच्याबाबतीत मुले बोटे मोडतात? परंतु आपल्या मुलाला महिन्याकाठी देत असलेल्या पैशांचे मुलं काय करतात? हे विचारायला देखील पालकांना वेळ नसतो़ तंबाखूजन्य पदार्थांची होते सहज उपलब्धता शासनाने तंबाखूजन्य पदार्थ सेवन व विक्री करण्यावर बंदी घातलेली आहे. मात्र शहरातल्या पानपट्टी पासून ते गावातल्या किराणा दुकाना पर्यंत सहज तंबाखूजन्य पदार्थ विकत मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. महत्वाचे म्हणजे तल्लफ झाल्यावर तंबाखू सेवनासाठी ती खिशात असावीच लागते असे नाही. कोणाही अनोळखीला ‘आहे का तंबाखू?’ असे म्हटले तर तंबाखू अन् चुना मिळतो. त्यासाठी ओळखीची गरज असावी लागते असे नाही. बाजारामध्ये तंबाखूचे अख्खे पानच विक्रीसाठी येतात. या पानाची भुकटी करून त्यात आणखी उत्तेजक पदार्थ मिसळून व्यसन करणार्‍यांची संख्याही कमी नाही. काही जण तर दंतमंजन म्हणूनही तंबाखू वापरतात. तंबाखूचे अर्थकारण एक व्यक्ती साधारणपणे दिवसभरात तंबाखूच्या दोन पुड्या सेवन करतो. त्यासाठी दहा ते बारा रुपये खर्च येतो. महिन्याकाठी हा खर्च साडेतीनशे ते चारशे रुपयांच्या घरात जातो. एका वर्षात एक व्यक्ती जवळपास पाच हजार रुपये केवळ तंबाखू व चुन्यावर खर्च करतो. व्यसने करणारांची संख्या पाहता जिल्ह्यामध्ये महिन्याकाठी वीस ते बावीस कोटी रुपयांची उलाढाल होते, अशी माहिती एका तंबाखू विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. गुटख्यावर बंदी आहे. त्यामुळे तो जास्तच ‘भाव’ खातो आहे. पाच ते पन्नास रुपयांपर्यंतच्या गुटखा पुड्या बाजारात उपलब्ध आहे.गुटख्याचे अर्थकारण तर तंबाखूच्या तुलनेत किती तरी पट अधिक आहे. डोळे चक्रावून सोडणारी ही उलाढाल कोणाच्या लक्षातही येत नाही. परंतु घामाचा दाम व्यसनापायी खर्ची होत असल्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांचे व्यसनाचे प्रमाण अल्प आहे. मात्र तरूणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कॅन्सर सारख्या आजाराला तरूण कवटाळत आहेत. महिलांमध्ये ५५ ते ६० वयोगटातील महिला तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्याचे पहावयास मिळत आहे. पुरूषांमध्ये मात्र २१ ते ४५ वयो गटातील लोकांची संख्या जास्त आहे. यामुळे तोंडाचे विकार होत आहेत. याबरोबरच जबडा सडने, तोंडाचा कॅन्सर होत आहे. - डॉ. ए. एस. खरात, दंतरोग तज्ञ, बीड

Web Title: A 'loss' curse loss of life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.