छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाचे आबालवृद्धांना वेध लागले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळ कोणता देखावा दाखवणार, अशी उत्सुकता सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. प्रभू श्रीरामाचा लंकेवरील विजय आणि पुष्पक विमानातून त्यांच्या आगमनाचा देखावा तयार केला जात आहे. याचबरोबर जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले-तेही एकाच ठिकाणी पाहण्याची संधी गणेशभक्तांना मिळणार आहे. विशेष म्हणजे यंदाही गणेशोत्सवावर गणपतीचे पिता महादेवावर आधारित देखावे लक्षवेधी ठरणार आहेत.
प्रमुख गणेश मंडळांचा कोणता देखावा असणार?१) जाधवमंडी : यादगार गणेश मंडळ यंदा ‘प्रभू श्रीरामांचे अयोध्येत पुष्पक विमानाद्वारे आगमन’ असा देखावा तयार करत आहे. सुमारे २५० फूट लांबून व २०० फूट उंचावरून पुष्पक विमान जाधवमंडीत श्रीराम, सीता व लक्ष्मण यांना घेऊन येणार आहे.२) खडकेश्वर मैदान : युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. यावरील यांत्रिकी करामतीवर आधारित देखावा खडकेश्वर मैदानात न्यू शिवशक्ती गणेश मित्रमंडळ साकारत आहे.३) दिवाणदेवडी : येथील पावन गणेश मंडळ यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपणारी शिवकालीन दुर्ग संकल्पनेवर आधारित देखावा उभारत आहे. यासाठी सुमारे ५० फूट उंचीचा मंडप उभारण्यात आला आहे.४) शहागंज : येथील गांधी पुतळा चौकातील नव सार्वजनिक गणेश मंडळाने दिल्ली येथील कलाकारांना आमंत्रित केले आहे. हे कलाकार महाकालचे तांडव नृत्य करणार आहेत.५) धावणी मोहल्ला : धावणी मोहल्ल्यातील बालकन्हैया गणेश मंडळ यंदा ‘उज्जैन येथील महाकालची पिंड व मंदिराचा गाभारा’ साकारणार आहे.६) नागेश्वरवाडी : येथील महाकाल प्रतिष्ठानच्यावतीने दक्षिणात्य मंदिर उभारण्यात येणार आहे.७) दशमेश नगर : दशमेश नगरातील अष्टांग गणेश मंडळ ४० फूट बाय २० फूट असे म्हैसूर येथील वैष्णव मंदिर उभारत आहे.