लुटमारी महाराष्ट्रात, ठेवी आंध्रात!
By Admin | Updated: November 19, 2014 01:00 IST2014-11-19T00:37:41+5:302014-11-19T01:00:31+5:30
औरंगाबाद : गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केलेल्या आंध्राच्या टोळीने गेल्या दोन वर्षांत केवळ औरंगाबादेच नव्हे, तर नांदेडपासून ते मनमाडपर्यंत ‘

लुटमारी महाराष्ट्रात, ठेवी आंध्रात!
औरंगाबाद : गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केलेल्या आंध्राच्या टोळीने गेल्या दोन वर्षांत केवळ औरंगाबादेच नव्हे, तर नांदेडपासून ते मनमाडपर्यंत ‘रेल्वे ट्रॅक’वरील गाव, शहरांमध्ये अनेक नागरिकांना लुटले असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्रात लुटमारी, ठकबाजी करायची अन् आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील बँक खात्यावर तात्काळ पैसे जमा करायचे... अशी या टोळीची पद्धत होती. काही महिन्यांतच आरोपींच्या एकाच खात्यावर तब्बल ३३ लाख रुपयांची उलाढाल झालेली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
गुन्हे शाखा पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून अरुण कुमार अब्राहम पटेल (२०, रा. बिटरगुंटा, चिल्लोर, आंध्र प्रदेश), अनिल दयाराम मायकेल (२८), मधू भास्कर रेड्डी (१९), चंद्रमा कोंड्या सल्ला (५०), अपराम पेटला (४५), दुर्गा नागराज (४०), सावित्री रेड्डी (४५) व रौसय्या गोडीथ्थ (४८) या आरोपींना अटक केली होती. या आरोपींनी गेल्याच आठवड्यात वाळूज एमआयडीसी परिसरातील एका पंपावर गाडीत डिझेल भरणाऱ्या व्यापाऱ्याला कारवर घाण पडल्याची थाप मारून त्याचे साडेतीन लाख रुपये लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर कुणाच्या अंगावर घाण फेकून, कुणाच्या गाडीचे टायर पंक्चर करून, तर कुणाला थाप मारून लक्ष विचलित करीत या आरोपींनी विविध बँकांसमोरून नागरिकांच्या बॅगा पळविल्याचे अनेक गुन्हे केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे.
नर्सरी चालवीत असल्याचा बहाणा!
हे आरोपी गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादेतील बजाजनगर परिसरात वास्तव्य करीत आहेत. तेथे त्यांनी एक मोठा फ्लॅट भाड्याने घेतला होता. आम्ही नर्सरी चालवितो, आॅर्डर घेऊन गावाकडून झाडे, रोपे मागवून त्यांची विक्री करतो, असे हे आरोपी लोकांना सांगत असत. विशेष म्हणजे नर्सरीच्या नावाचे व्हिजिटिंग कार्डही आरोपींनी छापले होते.
या आरोपींनी औरंगाबादप्रमाणेच परभणी, नांदेड येथेही भाड्याने घरे घेऊन ठेवली आहेत. औरंगाबादला गुन्हा केला की, ते तातडीने रेल्वेने नांदेड किंवा परभणीला जाऊन काही दिवस वास्तव्य करीत.
४मनमाडला गुन्हा केला की, औरंगाबादला येऊन थांबत आणि कधी कधी गुन्हा करून काही जण रेल्वेने सरळ आंध्राला आपल्या गावी जाऊन राहत होते. लपण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी त्यांनी रेल्वे ट्रॅकवर ही घरे घेऊन ठेवली होती, असे तपासात समोर आल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
आरोपींच्या एका बँक खात्याचे पासबुक तपासात पोलिसांच्या हाती लागले आहे. या पासबुकवर २०१३ ते आतापर्यंत तब्बल ३३ लाख रुपयांचा भरणा केल्याचे आढळून आले.
४विशेष म्हणजे ज्या ज्या दिवशी शहरात बॅग पळविल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याच्या दोन-तीन दिवसांनंतरही या खात्यावर मोठी रक्कम भरल्याचे दिसून येते. त्यावरून लुटलेला पैसा ते ‘त्या’ खात्यावर भरणा करीत होते, असे स्पष्ट झाल्याचे पोलीस निरीक्षक आघाव म्हणाले.
विशेष म्हणजे हे खाते आंध्र प्रदेशातील नेल्लोर शाखेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लुटलेली रक्कम हे गावाकडे ‘सेफ’ ठेवी म्हणून जमा करायचे, असे तपासात समोर आल्याचेही आघाव यांनी सांगितले.