कारचालकांचे साडेतीन लाख रुपये लुटले

By Admin | Updated: November 4, 2014 01:39 IST2014-11-04T01:08:55+5:302014-11-04T01:39:30+5:30

वाळूज महानगर : कारचे आॅईल गळत असल्याची थाप मारून फर्निचर व्यावसायिकांचे साडेतीन लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी लांबविल्याची घटना

Looted three and a half lakhs of car drivers | कारचालकांचे साडेतीन लाख रुपये लुटले

कारचालकांचे साडेतीन लाख रुपये लुटले


वाळूज महानगर : कारचे आॅईल गळत असल्याची थाप मारून फर्निचर व्यावसायिकांचे साडेतीन लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी लांबविल्याची घटना आज दुपारी पंढरपुरातील अब्बास पेट्रोल पंपावर घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, उदयसिंग गणपत गायकवाड (३५, रा. स्नेहवर्धिनी सोसायटी, जवाहर कॉलनी) यांचे जवाहर कॉलनीत फर्निचर विक्रीचे दुकान आहे. उदयसिंह गायकवाड हे आज दि.३ नोव्हेंबरला पंढरपूरच्या अलाहाबाद बँकेत कर्जाचा हप्ता भरण्यासाठी डस्टर कार क्रमांक एमएच-२०, डीजे-७१७१ मध्ये बसून पंढरपूरकडे निघाले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास उदयसिंग गायकवाड हे गाडीत इंधन भरण्यासाठी नगर रोडवरील अब्बास पेट्रोल पंपावर आले होते.
कारमध्ये इंधन भरत असताना एका अनोळखी युवकाने गायकवाड यांना तुमच्या कारमधील आॅईल गळत असल्याचे सांगितले. त्यामुळे इंधन भरल्यावर गायकवाड हे पेट्रोल पंपालगत थांबून कारचे बोनट उघडून इंधन कुठून गळत आहे, याची पाहणी करीत होते. याचदरम्यान, डोक्यात पिवळी टोपी घातलेल्या युवकाने शिताफीने कारचा दरवाजा उघडला व तिच्यात ठेवलेली साडेतीन लाख रुपये रकमेची बॅग घेऊन तो मुख्य रस्त्याच्या दिशेने पळाला. हा लुटमारीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच उदयसिंग गायकवाड यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी दुचाकीवरून डबलसीट आलेले युवक बॅग चोरलेल्या युवकाला दुचाकीवर बसवून औरंगाबाद शहराकडे सुसाट वेगाने पसार झाले.
हा आरडाओरडा ऐकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी व इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत साडेतीन लाख रुपये लुटून चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते.
या प्रकारामुळे घाबरलेल्या गायकवाड यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांशी संपर्क साधून साडेतीन लाख रुपये लुटल्याचे पोलिसांना सांगितले.
अब्बास पेट्रोल पंपावर दुपारी २ वाजता उदयसिंग गायकवाड हे कारमध्ये इंधन भरत असताना एका युवकाने त्यांच्या कारवर आॅईल फेकले होते. या युवकाचा साथीदार लाल रंगाच्या टीव्हीएस स्टार या दुचाकीवर स्वार झालेला होता. कारवर आॅईल फेकणाऱ्या युवकानेच तुमच्या कारमधून आॅईल गळत असल्याची थाप गायकवाड यांना मारली होती. कार उभी करून आॅईल गळत असल्याने बोनट उघडून पाहणी करीत असताना एक भामटा कारमधील रकमेची बॅग काढून मुख्य रस्त्याच्या दिशेने पळाला, तर दुचाकीवर असलेले त्याचे दोन साथीदार त्याला दुचाकीवर बसवून घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने तीन भामट्यांच्या हालचाली टिपल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच फौजदार अजय पांडे, गुन्हे शाखेचे फौजदार यू.पी. ठाकूर, पोकॉ. काकासाहेब तुपे, अमोल शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. कारचालकाला लुटणारे गुजरात राज्याच्या टोळीतील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरू होती.

Web Title: Looted three and a half lakhs of car drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.