पेट्रोलपंपांकडून लाखोंची लूट
By Admin | Updated: July 3, 2017 01:04 IST2017-07-03T01:00:26+5:302017-07-03T01:04:41+5:30
औरंगाबाद : ठाणे गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा आणि वैध मापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लागोपाठ तीन दिवस केलेल्या संयुक्त तपासणीत या आठवड्यात शहरातील तीन पेट्रोलपंपांची पेट्रोल चोरी उघडकीस आणली.

पेट्रोलपंपांकडून लाखोंची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ठाणे गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा आणि वैध मापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लागोपाठ तीन दिवस केलेल्या संयुक्त तपासणीत या आठवड्यात शहरातील तीन पेट्रोलपंपांची पेट्रोल चोरी उघडकीस आणली. या पेट्रोलपंपांवर मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून मापापेक्षा कमी पेट्रोल देण्यात येत होते. दर पाच लिटरमागे ३० ते १५० मिली इंधन कमी देऊन महिन्याकाठी सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत लूट झाल्याची शक्यता आहे.
जालना रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंप, पुंडलिकनगर रोडवरील एस्सार पेट्रोल पंप आणि एपीआय कॉर्नर येथील भवानी आॅटो पंप या तीन पेट्रोल पंपांना सील ठोकण्यात आले आहे.
‘लोकमत’ने विविध पेट्रोल व्यावसायिकांकडून मिळवलेल्या माहितीनुसार, या तिन्ही पेट्रोल पंपांवर दररोज तीन ते आठ हजार लिटर पेट्रोलची विक्री होत असे.
जालना रोडसारख्या वर्दळीच्या मार्गावर असणाऱ्या चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंपावर दिवासाकाठी येथे ६ ते ८ हजार लिटर पेट्रोलची विक्री होत असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी २४ जून रोजी येथे सर्वप्रथम तपासणी केली असता दर पाच लिटरमागे १५० मिलीपर्यंत कमी पेट्रोल दिले जात असल्याचे त्यांना आढळून आले.
प्रथमदर्शनी हे अत्यल्प प्रमाण वाटते. मात्र, दिवसाकाठी ६ हजार लिटर पेट्रोलची विक्री झाली असे जरी मानले तरी दिवसाला सुमरे १८० लिटर पेट्रोलची चोरी होते. पेट्रोलचे दर सरासरी ७५ रुपये गृहीत धरल्यास प्रतिदिन १३५०० रुपये तर महिन्याला सुमारे ४ लाख रुपयांचा अवैध
नफा.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ असाच हा प्रकार आहे. याचप्रकारे रविवारी (दि.२५) केलेल्या तपासणीत एपीआय कॉर्नरवरील भवानी आॅटो पंपावर पाच लिटरमागे ३० मिली इंधन चोरी होत असल्याचे समोर आले. म्हणजे प्रतिलिटर ६ मिली पेट्रोलची चोरी.
या पंपावर दिवसाकाठी ३ ते ४ हजार लिटर पेट्रोल विक्री होत असल्याचा अंदाज आहे. म्हणजे किमान विक्री जरी गृहीत धरली तरी दिवसाला १३५० रुपये आणि महिन्याकाठी ४०.५ हजार रुपयांची लूट झाल्याची शक्यता आहे.
पुंडलिकनगर रोडवरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपावरही एका दिवसातून सुमारे ४ हजार लिटर पेट्रोलची विक्री होते. येथे पाच लिटरमागे ५० मिली इंधन कमी दिले असे. म्हणजे महिन्याकाठी १२०० लिटर पेट्रोल चोरीतून ९० हजार रुपयांचा घोटाळा होत असे. शहरामध्ये सुमारे ३५ पेट्रोल पंप असून एका दिवसाला जवळपास ३.५ लाख लिटरची शहरात विक्री होते. पेट्रोलचा दर, प्रतिदिन पेट्रोल विक्री, इंधन चोरीचे प्रमाण या सर्व गोष्टी अनित्य असून सर्वसाधारण अंदाज बांधण्यासाठी त्यांचे काही ठराविक प्रमाण गृहीत धरण्यात आले आहेत.