व्हाईट टॉपिंगच्या रस्त्याला भेगा
By Admin | Updated: June 28, 2014 01:20 IST2014-06-28T00:52:44+5:302014-06-28T01:20:05+5:30
औरंगाबाद : शहरात ५ रस्त्यांची कामे व्हाईट टॉपिंगने (काँक्रीट) सुरू आहेत. त्यापैकी सिडको कॉर्नर ते अहिल्यादेवी होळकर चौक, एन-४ या रस्त्याला भेगा पडल्याचा आरोप सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी
व्हाईट टॉपिंगच्या रस्त्याला भेगा
औरंगाबाद : शहरात ५ रस्त्यांची कामे व्हाईट टॉपिंगने (काँक्रीट) सुरू आहेत. त्यापैकी सिडको कॉर्नर ते अहिल्यादेवी होळकर चौक, एन-४ या रस्त्याला भेगा पडल्याचा आरोप सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आज पाहणीदरम्यान केला. त्या कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने दिले. साईड ड्रेन, फु टपाथ, दुभाजकाचे काम व्यवस्थित होत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी कामाबाबत आक्षेप नोंदविला.
आज सकाळी महापौर कला ओझा, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, कार्यकारी अभियंता सिकंदर अली व प्रकल्प सल्लागार समितीच्या सदस्यांनी ५ ठिकाणच्या रस्त्यांची व ज्योतीनगर नाल्यावरील पुलाची पाहणी केली. जळगाव टी पॉइंट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंतच्या सर्व्हिस रस्त्याची पाहणी करण्यात आली. त्यानंतर एसबीआय ते सेंट्रल नाका, क्रांतीचौक ते सिल्लेखाना ते पैठणगेट, पीरबाजार चौकातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली.
सभापती म्हणाले....
रस्त्यांची किती कामे घेतली आहेत. कामांची डेडलाईन काय आहे. किती टक्के कामे झाली आहेत, याचा आढावा घेतला. पावसाळा लागला आहे. त्यामुळे मुदतीत कामे होणे गरजेचे आहे. साईड ड्रेनची कामे खोळंबलेली आहेत. फुटपाथ, दुभाजकाचे काम चांगले होत नसल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले आहे. रस्त्यांच्या कामांची गती वाढविण्याचे आदेश दिले आहेत, असे सभापती विजय वाघचौरे यांनी सांगितले.
१४ रस्त्यांची कामे
पुण्याच्या जे. पी. कन्स्ट्रक्शन्सकडे ४० कोटी रुपयांतून व्हाईट टॉपिंगची कामे दिलेली आहेत. त्यातील ५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ५० टक्के कामे झालेली आहेत.
कंत्राटदाराला अद्याप एक रुपयाही मनपाने अदा केलेला नाही. कंत्राटदार एवढ्याच रस्त्यांची कामे पूर्ण करील, अशी चर्चा आहे. यावर सभापती म्हणाले, पूर्ण रस्त्यांची कामे पालिका करून घेईल.