बळीराजाच्या नजरा आकाशाकडे
By Admin | Updated: July 14, 2014 01:04 IST2014-07-14T00:45:44+5:302014-07-14T01:04:50+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे घेऊन पेरणी केली खरी; पण त्यानंतर पाऊसच पडत नसल्याने बळीराजा चिंतित झाला

बळीराजाच्या नजरा आकाशाकडे
औरंगाबाद : जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे घेऊन पेरणी केली खरी; पण त्यानंतर पाऊसच पडत नसल्याने बळीराजा चिंतित झाला असून, सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
गंगापूर तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती
गंगापूर : मृग नक्षत्रापासून आर्द्रा नक्षत्रापर्यंत जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. आर्द्रा संपता संपता आषाढी एकादशीच्या पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी पांडुरंगाच्या आशीर्वादाने तालुक्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित होऊन पुढे जोराचा पाऊस येणार, या आशेने शेतातील थोड्याफार ओलीवर खरीप हंगामातील अधिक आर्थिक उत्पन्न येणारे कपाशी व मका या पिकांची लागवड मोठ्या जोमाने सुरू केली होती. त्यानंतर पावसाने पुन्हा डोळे वटारल्याने शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले असून, लागवड केलेल्या पिकास वेळीच पाऊस न झाल्यास बी-बियाणे वाया जाणार व पुढेही लागवडीस उशीर होत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊस येत नसल्याने व्यापारी व कृषी व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, कृषी व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत लाखो रुपयांचा माल उठाव नसल्याने पडून आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले आहे. पाऊस पडावा यासाठी शेतकरी वर्गासह व्यापारी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत.
वेरूळ परिसरात निराशा
वेरूळ : परिसरात अर्धा आषाढ संपला तरी पावसाने पाठ फिरविली आहे. नांगरट केलेली ढेकळं शेतात तशीच असल्याने संपूर्ण परिसरातील पेरणी ठप्प झाली आहे. एकादशीला हमखास पाऊस येईल, पंढरपूरच्या विठोबाची कृपा होईल, या आशेने धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पाऊस न आल्याने निराशा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर पेरणी केली आहे, त्या पिकांचीही पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. नदी-नाले कोरडेठाक असून, भूगर्भातील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. आता बळीराजाकडे चाऱ्याची उपलब्धता नसल्याने मोठ्या प्रमाणात बेभाव पशुधन बाजारात चालले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असून, जागोजागी चारा छावणी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मजुरांची शहराकडे धाव
शेतीची कामे बंद, धंदे बंद असल्यामुळे मजुरांचे जथे शहराकडे धावू लागले आहेत. त्यामुळे मोठमोठी गावे बकाल होत असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. याकडे वन विभाग, कृषी विभाग व महसूल विभाग यांनी गांभीर्याने घेऊन मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी आहे.
पिंप्रीराजा परिसरात प्रतीक्षा
पिंप्रीराजा : काही दिवसांपूर्वी झालेल्या थोड्या पावसानंतर शेतकऱ्यांनी लागवड केली; पण नंतर पाऊस झालाच नाही, त्यामुळे पेरलेले बी-बियाणे वाया जाते की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतित झाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत आहे. (वार्ताहर)
बाजारसावंगी परिसरात दुबार पेरणी सुरू
बाजारसावंगी : परिसरात पहिली पेरणी वाया गेली असल्याने शेतकरी दुबार पेरणीकडे वळला असून, अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने अर्धा पावसाळा उलटला जात असताना नदी-नाले, विहिरी कोरड्याठाक आहेत. २० जून रोजी बाजारसावंगी परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. पेरणीस उशीर होत असल्याचे पाहून सर्वत्र शेतकऱ्यांनी कापूस, मका, तूर पिकाची पेरणी उरकली; मात्र यानंतर पावसाने तब्बल पंधरा ते वीस दिवसांची उघडीप दिल्याने पहिली पेरणी पूर्णपणे वाया गेली. यामुळे पहिल्या पेरणीची मशागत, बियाणे वाया गेले. ढग येतात... जातात... दररोज पडणारे कडक ऊन, दुपारनंतर येणारे ढग निघून जात असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. आषाढी एकादशीला पडलेल्या तुरळक पावसाने शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणीस सुरुवात केली आहे; मात्र अजूनही दमदार पावसाची नितांत गरज आहे. दुबार पेरणी सुरू असल्याने त्रस्त शेतकऱ्यांना मोफत, तसेच अनुदान स्वरूपात कापूस, मका बियाणांचे वाटप करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
उंडणगावात दुबार पेरणीचे संकट, अनेक शेतकऱ्यांनी केली मक्याची धूळपेरणी
उंडणगाव : येथे ६ जुलै रोजी झालेल्या पावसानंतर पाऊस नसल्याने उगवून आलेले पीक वाळण्याचा धोका असून, दुबार पेरणीचे संकट आले; मात्र येथील खंडाळा व गोळेगाव परिसरात पेरणीयोेग्य पाऊस नसल्याने या भागातील शेतकरीदेखील पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी मक्याची धूळपेरणी केली होती. आठ दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने मका उगवला; मात्र प्रचंड उष्णता व पाऊस गायब झाल्याने ही कोवळी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे आलेली मदत काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले; मात्र यादीत नाव नाही, अशा शेतकऱ्यांची नावे पुन्हा पाठविली; मात्र अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी वर्गात संताप आहे. दुबार पेरणीसाठी शासनातर्फे बियाणे व खत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.