संवेदनशील केंद्रावर करडी नजर
By Admin | Updated: February 6, 2017 23:48 IST2017-02-06T23:47:10+5:302017-02-06T23:48:49+5:30
जालना : जिल्हा परिषद ५६ गट आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

संवेदनशील केंद्रावर करडी नजर
जालना : जिल्हा परिषद ५६ गट आणि पंचायत समित्यांच्या ११२ गणांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील १० अतिसंवेदनशील आणि १०२ संवेदशील मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील हिटलिस्टवर असलेल्या गुन्हेगारांना आत्तापासूनच स्थानबद्ध करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना याबाबत सूचना केल्या आहेत. आपापल्या तालुक्यातील संवेदनशील केंद्राची पाहणी करून उपद्रव माजविणाऱ्या गुन्हेगारांवर बारीक नजर राहणार आहे. शिवसेना, भाजपा पक्षाची युती तुटली आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने मिनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. चारही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळावेत, निवडणूक निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. घनसावंगी तालुक्यात ३, अंबड २, जालना १ बदनापूर २ आणि मंठा तालुक्यात २ असे दहा अतिसंवेदनशील मतदान केंद्र असल्याने या मतदान केंद्रावर पोलीस यंत्रणेसह राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल तसेच प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. संवेदशील गावातील पोलीस पाटील तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्यांना मार्गदर्शन करून मतदान शांततेत करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या केंद्रावर कोणताही गैरप्रकार अथवा वाद होऊ नये म्हणून प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात आली आहे. भोकरदन व तालुक्यात सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या केंद्रावर पोलीस दलाच्या वतीने विशेष बंदोबस्तासह छायाचित्रणही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. पोलीस पाटील व तंटामुक्त गाव समिती सदस्यांनी मतदान शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)