गल्लीबरोबरच मुंबईकडेही लक्ष..!
By Admin | Updated: October 19, 2014 00:20 IST2014-10-18T23:57:40+5:302014-10-19T00:20:02+5:30
जालना शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गल्लीतून मुंबईकडेच लक्ष असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

गल्लीबरोबरच मुंबईकडेही लक्ष..!
जालना शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे गल्लीतून मुंबईकडेच लक्ष असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
रविवारी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे जसजसे निकालाचे चित्र समोर येत जाईल, तसतसे मुंबईच्या तख्तावर कोण विराजमान होईल, हे स्पष्ट होणार आहे.
सुरूवातीपासूनच या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता होती. सोशल नेटवर्किंगसह सर्वांच्याच हातात असलेल्या स्मार्टफोननेही त्यात भर टाकली. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकांविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, पाठोपाठ प्रचाराची रणधुमाळी उडाली.
आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. जालना, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी व परतूर या मतदारसंघात कमालीची उत्सुकता आहे. यंदा मतदानाची टक्केवारीही मोठ्या प्रमाणात वाढली. वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल याविषयी मतदानाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच चर्चा सुरू झाली होती.
मतदानानंतर तीन-चार दिवसांच्या कालावधीत उमेदवार आकडेमोडीत रमले. शहरातील चौका-चौकात तर ग्रामीण भागातील पारा-पारावर निवडणुकीच्याच गप्पा रंगत होत्या. या गप्पांमधून स्थानिक उमेदवारापेक्षा मुंबईच्या आकडेवारीवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले होते. गल्लीतही मुंबईच्या गप्पा व राजकीय समिकरणे कशी होतील, राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कोण मुख्यमंत्री होईल असे विविध अंदाज बांधण्यात येत होते. त्यातच काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ‘एक्झीट पोल’मुळे तर या चर्चांना अधिकच रंगत आली. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते छातीठोकपणे आपलाच उमेदवार निवडून येईल, यांचेच सरकार येईल, असे दावे दावे-प्रतिदावे करत होते.
ग्रामीण भागातील पारापासून ते शहरातील चौका व व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैजाही लावल्या गेल्या आहेत. यातून कोट्यावधी रूपयांची देवाण-घेवाण होणार असल्याची चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहे. एकूणच विधानसभा निवडणूकीविषयी गाव, वस्ती, वाड्या-तांड्यावरील मंडळीही थेट मुंबईच्या सत्तेवर चर्चा करत आहे. (प्रतिनिधी)
विजय कोणाचा होणार याविषयीची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
४१९ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजेपासूनच शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक टीव्हीसमोर ठाण मांडून बसणार हे निश्चित. योगायोगाने या दिवशी रविवार असल्यामुळे हा सुटीचा दिवस नेमका कोणासाठी फायद्याचा ठरणार हे आता काही तासातच कळणार आहे. निवडणूक निकालांविषयी अबालवृद्धांमध्ये मोठी उत्सुकता आहे.