८९ संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर
By Admin | Updated: April 17, 2017 23:35 IST2017-04-17T23:33:33+5:302017-04-17T23:35:12+5:30
लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत असून, ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, यातील ८९ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत.

८९ संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर
लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत असून, ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, यातील ८९ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आयोगाने जय्यत तयारी केली असून, संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम २२ मार्च रोजी जाहीर झाल्यापासून आयोगाने निवडणुकीची जय्यत तयारी केली असून, १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी लातूर शहरात ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एक कंट्रोल युनिट व उमेदवार संख्येवरून बॅलेट युनिट मतदान केंद्रांवर १८ एप्रिल रोजी सायंकाळी पोहोचविले जाणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी एकूण २ हजार २८३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ मतदान अधिकारी, सहाय्यक आणि अन्य ४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीनवेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी दर्जाचे एकूण ६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. या अधिकाऱ्यांमार्फतच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. ३७१ मतदान केंद्रांपैकी ८९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही राहणार आहे.