लोणीकर व खोतकर यांची वर्णी अपेक्षित
By Admin | Updated: December 5, 2014 00:59 IST2014-12-05T00:56:38+5:302014-12-05T00:59:04+5:30
जालना: शिवसेना व भारतीय जनता पक्षात अखेर गुरुवारी सत्तेतील वाट्याबाबत समेट घडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला.

लोणीकर व खोतकर यांची वर्णी अपेक्षित
जालना: शिवसेना व भारतीय जनता पक्षात अखेर गुरुवारी सत्तेतील वाट्याबाबत समेट घडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, या विस्तारात या जिल्ह्यातील आ. बबनराव लोणीकर (भाजप) व आ. अर्जुन खोतकर (शिवसेना) या दोघांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे चित्र आहे.
या जिल्ह्यास केंद्रिय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे राजकीय क्षेत्रासह जिल्ह्यात मोठा आनंद व्यक्त झाला. या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुका आल्या. त्यातही भाजपाने पाचपैकी तीन जागा पटकावून मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ता परिवर्तनात या जिल्ह्यास निश्चितपणे वाटा मिळणार अशी चिन्हे होती. त्याप्रमाणे भाजप पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष तथा आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासंदर्भात जवळपास निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत सुध्दा दिले आहेत. लोणीकर हे परतूरमधून निवडून आले आहेत. ते तिसऱ्यांदा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. १९९९ व २००४ च्या निवडणुकीत ते सलग दोन वेळा विजयी झाले होते. २००९ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. परंतु गेल्या निवडणुकीत पराभावाचा लोणीकर यांनी या निवडणुकीत वचपा काढला.त्यामुळेच भाजपातील त्यांची ज्येष्ठता ओळखूनच राज्यमंत्री मंडळात वर्णी लागणार हे स्पष्ट आहे. (प्रतिनिधी)४
राज्यात शिवसेनेच्या सहकार्याने भाजपाने सत्ता हस्तगत केल्यास या जिल्ह्यास शिवसेना श्रेंष्ठीकडूनही सत्तेत वाटा दिला जाईल असे चित्र होते. परंतु या दोन्ही पक्षातील श्रेष्ठीत सत्तेतील वाट्यासंदर्भात दीर्घकाळ खलबत्ते रंगली. त्यातून वार्तावरण सुध्दा गढुळ झाले. अखेर गुरुवारी या दोन्ही पक्षांनी समन्वयातून सत्तेतील वाटा निश्चित केला. त्यामुळे आता या जिल्ह्याला शिवसेनेच्या रुपाने सुध्दा सत्तेत वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजीमंत्री अर्जुन खोतकर हे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळेच त्यांचीच वर्णी अपेक्षित आहे.