आचारसंहितेमुळे लांबली बैठक
By Admin | Updated: November 3, 2016 01:35 IST2016-11-03T01:30:18+5:302016-11-03T01:35:35+5:30
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची आयोजित महत्त्वपूर्ण बैठक

आचारसंहितेमुळे लांबली बैठक
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची आयोजित महत्त्वपूर्ण बैठक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडली आहे. शुक्रवारी औरंगाबादेत ही बैठक होणार होती. बैठक जरी रद्द झाली असली तरी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी यासंदर्भात बुधवारी शहरात आढावा बैठक घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदाचीही धुरा आहे. यामुळे त्यांनी राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण, जप्त मुद्देमाल परत करण्यासंबंधी किती कार्यक्रम घेण्यात आले, जातीय सलोखा राखण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम, महिला अत्याचारांसंबंधीच्या घटना आणि पोलिसांवरील हल्ले रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, गुन्ह्यातील आरोपींचे शिक्षेचे प्रमाण आदी महत्त्वाच्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे सध्या आचारसंहिता लागू असल्याने मुख्यमंत्र्यांची ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले. दरम्यान, अतिरिक्त महासंचालक संजयकुमार यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तालयात औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. या बैठकीला पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त वसंत परदेशी, एएसपी बच्चनसिंग, हर्ष पोद्दार, एसीपी खुशालचंद बाहेती आदी उपस्थित होते.