Lokmat APL: सलमान अहमदच्या अष्टपैलू खेळीने मनजीत प्राइड वर्ल्डची अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:02 PM2023-02-06T12:02:18+5:302023-02-06T12:04:10+5:30

सलमान अहमद याने ३ षटकांत १४ धावा देत, केदार जाधव, प्रदीप जगदाळे आणि अविनाश मुके यांना बाद करीत, पटेल किंग वॉरियर्सच्या दीडशेपेक्षा जास्त धावा फटकावण्याच्या आशांना सुरुंग लावला.

Lokmat APL: Manjeet Pride World reach the finals by Salman Ahmed's all-rounder play | Lokmat APL: सलमान अहमदच्या अष्टपैलू खेळीने मनजीत प्राइड वर्ल्डची अंतिम फेरीत धडक

Lokmat APL: सलमान अहमदच्या अष्टपैलू खेळीने मनजीत प्राइड वर्ल्डची अंतिम फेरीत धडक

googlenewsNext

औरंगाबाद : सामन्याला कलाटणी देणारा गोलंदाजीत स्पेल टाकल्यानंतर फलंदाजीतही स्फोटक अर्धशतकी खेळी करणाऱ्या सलमान अहमदच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर मनजीत प्राइड वर्ल्ड संघाने पटेल किंग वॉरियर्स संघावर तब्बल १८ चेंडू आणि ९ गडी राखून पराभव करीत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. सचिन शेडगे व अपूर्व वानखेडे यांची स्फोटक खेळीही मनजीत प्राइड वर्ल्डच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.

पटेल किंग वॉरियर्स संघाने १४० धावांचे आव्हानही मनजीत प्राइड वर्ल्ड संघाने सलमान अहमद, सचिन शेडगे आणि अपूर्व वानखेडेच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर १२ षटकांत १ गडी गमावून लिलया पेलले. त्यांच्याकडून सलमान अहमदने ३१ चेंडूंत ३ चौकार, ५ षटकारांसह नाबाद ६१, सचिन शेडगेने २१ चेंडूंत ७ चौकार, २ षटकारांसह ४४ आणि अपूर्व वानखेडेने २१ चेंडूंत १ चौकार व ३ उत्तुंग षटकारांसह ३५ धावा केल्या. पटेल किंग वॉरियर्सकडून प्रदीप जगदाळेने २४ धावांत १ गडी बाद केला.

सचिन शेडगेने सलमान अहमदच्या साथीने ३० चेंडूंतच ६४ धावांची वादळी भागीदारी करीत, मनजीत प्राइड इलेव्हन संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचला. यात सचिन शेडगेचा २१ चेंडूंत ४४ धावांचा वाटा होता. सचिन शेडगे बाद झाल्यानंतर सलमान अहमदने आक्रमक खेळाची सूत्रे आपल्याकडे घेतली. त्याने अपूर्व वानखेडे याच्या साथीने ४३ चेंडूंतच ७८ धावांचा पाऊस पाडत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सचिन शेडगेने चौकार आणि षटकाराची आतषबाजी केली. त्याने विशेषत: श्रीवत्स कुलकर्णी याचा विशेष समाचार घेताना, त्याच्या एकूण चार चौकार आणि एक षटकार ठोकला. या दरम्यान, सलमान अहमदनेही श्रीवत्सला कुलकर्णीला मिडविकेटला उत्तुंग षटकार ठोकला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे मनजीत प्राइडने वर्ल्डने २३ चेंडूंत धावांचे अर्धशतक धावफलकावर लगावले. या दोघांनी पाचवे षटक टाकणाऱ्या प्रदीप जगदाळे याला प्रत्येकी एक सणसणीत षटकार ठोकला.

मात्र, याच षटकांत उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात अनिकेत जाधवच्या हातात सोपा झेल देऊन बाद झाला. सचिन परतल्यानंतर सलमान अहमदने खेळाची सूत्रे आपल्याकडे घेतली. सलमान व अपूर्व वानखेडे यांनी केदार जाधव याच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला करताना, मिडविकेटला उत्तुंग षटकार ठोकताना धावगतीचा आलेख उंचावत ठेवला. दरम्यान, सलमान अहमदने सय्यद जावेदला चौकार व नंतर एकेरी धाव घेत, २ चौकार व ४ षटकारांसह २५ धावांत अर्धशतक पूर्ण केले. १२ व्या षटकांत अपूर्वने अनिकेत जाधवला दोन उत्तुंग आणि सलमान अहमद याने लाँगॉफला षटकार ठोकत मनजीत प्राइड वर्ल्डच्या विजयावर शिक्कामोर्तब केले व फायनलचे तिकीट निश्चित केले.

त्या आधी केदार जाधवच्या आणखी एका अफलातून अर्धशतकी खेळीच्या बळावर पटेल किंग वॉरियर्स संघाने १५ षटकांत ९ बाद १३९ धावांपर्यंत मजल मारली. केदार जाधवने ३४ चेंडूंत ८ चौकार, ३ षटकारांसह ५८, प्रदीप जगदाळेने ११ चेंडूंत १६, भास्कर जिवरगने १३ चेंडूत एक चौकार, २ षटकारांसह नाबाद २४ धावांची खेळी केली. मनजीत प्राइड वर्ल्डकडून सलमान अहमदने १४ धावांत ३, हिंदुराव देशमुखने २६ धावांत २ तर कार्तिक बालय्या, सय्यद आरेफ व सय्यद परवेझ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

केदार जाधव पूर्ण भरात असताना मात्र, दुसरीकडून त्याला तोडीची साथ मिळू शकली नाही. पटेल किंग वॉरियर्सचे फलंदाज नियमित अंतरात बाद होत गेले. २६ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक पूर्ण करणाऱ्या केदार जाधवने त्याच्या लाजवाब खेळीत संदीप राठोड आणि फिरकी गोलंदाज सय्यद आरेफ यांचा विशेष समाचार घेतला. केदार जाधवने दुसरे षटक टाकण्यास आलेल्या संदीप राठोडला एकाच षटकांत बंदुकीच्या गोळीतून सुटावा, असा फ्लिक, लॉफ्टेड ऑनड्राइव्ह आणि ऑफड्राइव्हचे असे एकूण ३ चौकार मारत मैदानात चैतन्य निर्माण केले. केदारने डावाच्या चौथ्या षटकांत पुन्हा संदीप राठोडला नेत्रदीपक असा लेटकट, फ्लिकचे असे एकूण तीन चौकार मारत मैदान दणाणून सोडले. केदारच्या फटकेबाजीमुळे संदीप राठोडला त्याच्या पहिल्या दोन षटकांत ३० धावा मोजाव्या लागल्या. फिरकी गोलंदाज सय्यद आरेफचाही केदारने तीन आणि प्रदीपने एक असे चार षटकार ठोकत २५ धावा वसूल केल्या. यात प्रदीप जगदाळेने सय्यद आरेफला लाँगॉफला षटकार ठोकल्या.

त्यानंतर, केदारने लाँगॉन आणि लाँगॉफला षटकार ठोकला. या फटकेबाजीमुळे किंग वॉरियर्सच्या ३० चेंडूंत ७३ धावा धावफलकावर लगावले. केदार व प्रदीप जगदाळेच्या स्फोटक खेळीमुळे पटेल किंग १६० पर्यंत मजल मारेल, अशी स्थिती होती. मात्र, त्यानंतर कर्णधार सलमान अहमद आणि सय्यद परवेझ यांनी सुरेख गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीला ब्रेक लावला. दरम्यान, सय्यद परवेझला कटचा चौकार मारणाऱ्या केदार जाधवने २६ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. अखेर सलमान अहमदने केदार जाधवला निर्णायक क्षणी संदीप राठोडकडे झेल देण्यास भाग पाडत बाद केले. त्यानंतर, भास्कर जीवरगने १३ चेंडूंत २ षटकार व एका चौकारांसह २४ धावा फटकावत पटेल किंग वॉरियर्स संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

टर्निंग पॉइंट
केदार जाधव व प्रदीप जगदाळे धोकादायक ठरत असताना, सलमान अहमद याने ३ षटकांत १४ धावा देत, केदार जाधव, प्रदीप जगदाळे आणि अविनाश मुके यांना बाद करीत, पटेल किंग वॉरियर्सच्या दीडशेपेक्षा जास्त धावा फटकावण्याच्या आशांना सुरुंग लावला. सलमान अहमदप्रमाणेच सय्यद परवेज याने ३ षटकांत फक्त १८ धावा देत पटेल किंग वॉरियर्स संघाला मोठ्या धावसंख्येपासून रोखले.
महत्त्वाच्या क्षणी इम्रान खान याने ७ चेंडूंत २ धावा केल्या.पटेल किंग वॉरियर्सला खराब क्षेत्ररक्षणाचाही मोठा फटका बसला.
सलमानने सचिन शेडगे आणि अपूर्व वानखेडे याच्या साथीने केलेली धडाकेबाज भागीदारीने सामन्याचा निकाल निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक

पटेल किंग वॉरियर्स : १५ षटकांत ९ बाद १३९. (केदार जाधव ५८, भास्कर जीवरग नाबाद २४. सलमान अहमद ३/१४, हिंदुराव देशमुख २/२६).

Web Title: Lokmat APL: Manjeet Pride World reach the finals by Salman Ahmed's all-rounder play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.