लोकसभेची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही
By Admin | Updated: July 26, 2014 00:42 IST2014-07-25T23:51:08+5:302014-07-26T00:42:44+5:30
वसमत : लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी, जाहिरातबाजी करण्यात आली. मतदारही त्यात फसले. आता मात्र ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी महागाई वाढत असल्याने जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे.
लोकसभेची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही
वसमत : लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी, जाहिरातबाजी करण्यात आली. मतदारही त्यात फसले. आता मात्र ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी महागाई वाढत असल्याने जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेनेला नाही तर मोदीला मतदान झाले. आता विधानसभेत मात्र तसे होणे शक्य नाही. आघाडीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. वसमत येथे आयोजित राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.
येथील मयुर मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचा जिल्हास्तरीय निर्धार मेळावा शुक्रवारी पार पडला. मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यमंत्री फौजिया खान, आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ. विक्रम काळे, माजी खा. गणेशराव दुधगावकर, अॅड. शिवाजी माने, सुरेश वरपुडकर, प्रताप देशमुख, अरविंद चव्हाण, दिलीप चव्हाण, विनोद झंवर, रत्नमाला शिंदे, जगजित खुराणा, सभापती राजू पाटील नवघरे, देवीदास कऱ्हाळे, अॅड. डी. बी. पार्डीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी केले. माजी खा. अॅड. शिवाजीराव माने यांनी बोलताना जागा वाटपाबाबत जो निर्णय द्यायचा तो पक्षाने द्यावा, आमच्यावर जी जबाबदारी द्याल ती आम्ही पार पाडू मात्र स्वाभीमान गहाण टाकणारी जबाबदारी आमच्यावर टाकू नका, असे आवाहन केले. यावेळी माजी खा. गणेशराव दुधगावकर, फौजिया खान यांनीही मार्गदर्शन केले.
आ. दांडेगावकर यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम आहे. तिन्ही जागा राष्ट्रवादीने लढवण्याचा निर्धार केला तर योग्य उमेदवारही आहेत व तिन्ही जागा निवडणुनही येतील, असा विश्वास व्यक्त केला. वसमत मतदारसंघात काहीजण आपल्यासोबत होते. आता कोणी कमळ घेवून फिरत आहेत. तरी कोणी पक्ष निश्चित झाला नसला तरी निवडणूक लढवण्याची भाषा करत असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता अॅड. शिवाजीराव जाधव व उज्वला तांभाळे यांना लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करताना त्यांनी कधी एखादी सहकारी संस्था, कारखाना, सोसायटी तरी काढली का? कोणाला रोजगार मिळवून दिला का? असा प्रश्न उपस्थित केला. दिल्लीत शरद पवार यांचे वजन होते. कृषीमंत्री म्हणून ते देशभर ओळखले जात होते. आज केंद्रीय कृषीमंत्री कोण आहेत? त्यांचे नावही कोणाला माहित नाही, अशी टीका त्यांनी केली.
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. आगामी काळात एका विद्यापीठास बहिणाबाई चौधरी तर दुसऱ्या विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगितले. मराठा व मुस्लिम समाजास आरक्षण दिले. सुकन्या योजना राबवली. डीआरडीसाठी घरे देण्यासाठी तरतूद केली. डीपीडीसीसाठी ८० कोटी रुपये दिले. सर्वांगिन विकासाच्या योजना शासनाने राबवल्या असल्याचेही सांगत पाच वर्षातील शासनाच्या कामकाजाच्या लेखा जोखाही त्यांनी मांडला. सूत्रसंचालन प्रा. सुभाष मस्के यांनी केले.
(वार्ताहर)
सन्मानजनक जागा वाटप व्हावे- सुनील तटकरे
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाषणात काँग्रेसला खडेबोल सुनावत मराठवाड्यात जे काँग्रेसचे दोन खासदार दिसत आहेत ते राष्ट्रवादीमुळेच आहेत, हे विसरू नका, असा इशारा दिला. शरद पवार यांच्यामुळेच १५ वर्ष आघाडीचे सरकार आहे व त्यामुळेच काँग्रेसला १५ वर्षापासून मुख्यमंत्रीपद मिळत आहे. याचीही आठवण ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. आघाडी व्हावी, ही भूमिका आहे; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली शक्ती पाहता जागा वाटप सन्मानजनक व्हावे, गतवेळी कळमनुरी मतदार संघ काँग्रेसला दिला होता. तो आता काँग्रेसला हवा आहे, असा सुचक इशाराही त्यांनी दिला व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सत्तेवर आणण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले.