Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रावर पाणी, वीज, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:42 IST2019-03-26T19:42:01+5:302019-03-26T19:42:54+5:30
प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रनिहाय माहितीचे संकलन

Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रावर पाणी, वीज, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील १९३६ मतदान केंद्रांपैकी ७८ केंद्रांवर वीज, पाणी, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ज्या मतदान केंद्रांवर भौतिक सुविधा नाहीत, त्या केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
सूत्रांनी सांगितले की, ७८ केंद्रांवर वीजपुरवठा नाही. तेथे वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरण कंपनीला सूचना करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या काळात निवडणुका असल्यामुळे मतदान केंद्रावर वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. शिवाय इंटरनेट सेवा सुरळीत मिळावी, यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांशी २ महिन्यांपूर्वी चर्चा झाली आहे. मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून काही माहिती घ्यायची असल्यास इंटरनेट सेवा महत्त्वाची असेल. त्यामुळे प्राधान्याने त्यासाठी तयारी केली आहे.
पाणीपुरवठा प्रत्येक मतदान केंद्रावर करता येईल, कर्मचाऱ्यांसह मतदारांसाठीदेखील पाणी उपलब्ध होईल, यासाठी आढावा घेण्यात आला आहे. उन्हाळ्यामुळे मतदान केंद्राबाहेर सावलीची व्यवस्था व्हावी, यासाठी शेड टाकण्यात येणार आहेत. बहुतांश मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत.
२३ एप्रिल रोजी मतदान आहे, तोपर्यंत नियोजन करण्यासाठी कालावधी आहे. पाणी, वीज, इंटरनेट सेवा तत्पर ठेवण्याचे सध्या आव्हान असले तरी त्या सुविधा देण्यासाठी तयारी केली जात आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सध्या १८ लाख ५७ हजार ६४५ मतदार आहेत. १० एप्रिलपर्यंत यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे.
मतदारसंघातील मतदान केंद्र
विधानसभा मतदारसंघ केंद्र
कन्नड ३५१
औरंगाबाद मध्य ३१२
औरंगाबाद पश्चिम ३३६
औरंगाबाद पूर्व २९२
गंगापूर २९९
वैजापूर ३४६
एकूण १९३६