लोहारा-उमरग्यात जोरदार पाऊस
By Admin | Updated: June 13, 2015 23:51 IST2015-06-13T23:51:57+5:302015-06-13T23:51:57+5:30
उस्मानाबाद : शुक्रवारसह शनिवारीही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मागील काही दिवसात होत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी सुरु केली आहे.

लोहारा-उमरग्यात जोरदार पाऊस
उस्मानाबाद : शुक्रवारसह शनिवारीही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मागील काही दिवसात होत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी सुरु केली आहे.
शुक्रवारी उमरगा तालुक्याला पावसाने झोडपले. शनिवारी पहाटेपर्यंत तालुक्यात ५२.८ मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे. यात मुरुम मंडळात ४० मिमी, दाळींब मंडळामध्ये ४२, उमरगा ४९, मुळज ४५ तर नारंगवाडी मंडळामध्ये २२ मिमी पाऊस झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यात १२.८८, तुळजापूर ६.७१, भूम १२.८०, कळंब ५.६७, परंडा १८.४० तर वाशी तालुक्यात शनिवारी सकाळपर्यंत १६.१७ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सुमारे एक तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे मुरुम येथील बेन्नीतुरी नदीला पाणी आले होते. परिसरातील मुरुम, कोथळी, कंटेकूर, कदेर, मुरळी येथेही चांगला पाऊस झाला.
लोहारा शहरासह तालुक्यात शनिवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अर्धातास पावसाने हजेरी लावली़ तर हिप्परगा (रवा) परिसरात दमदार पाऊस झाला़ या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह पेरणीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ लोहारासह हिप्परगा (रवा), नागराळ, बेलवाडी, मोघा, खेड, धानुरी, लोहारा (खुर्द), मार्डी, बेंडकाळ आदी गावात शनिवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून झालेल्या रिमझिम पावसानंतर हा पाऊस चांगला झाला. अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी विजय लोमटे, शरण्णप्पा कबाडे, आयनोद्दीन सवार, सूर्यकांत बिराजदार यांनी सांगितले़(वार्ताहर)