शिक्षकांसाठी जि.प.ला ठोकले कुलूप
By Admin | Updated: September 13, 2014 00:11 IST2014-09-12T23:51:00+5:302014-09-13T00:11:28+5:30
परभणी: शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी जि. प. अध्यक्ष, सीईओ, अतिरिक्त सीईओ यांच्या कक्षात विद्यार्थ्यांची शाळा भरविली.

शिक्षकांसाठी जि.प.ला ठोकले कुलूप
परभणी: मानवत तालुक्यातील रामपुरी येथील जिल्हा परिषद शाळेत असलेली शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी जि. प. अध्यक्ष, सीईओ, अतिरिक्त सीईओ यांच्या कक्षात विद्यार्थ्यांची शाळा भरविली. तरीही अधिकारी किंवा पदाधिकारी येत नसल्याने या कक्षांना कुलूप ठोकण्यात आले. लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
रामपुरी येथे जिल्हा परिषदेची दहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत शिक्षकांच्या १९ पदांपैकी तब्बल ११ पदे गेल्या चार ते पाच वर्षांपासून रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून येथील पालक शिक्षण विभागाकडे करीत आहेत. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास या गावातील जि. प. शाळेमधील जवळपास १०० ते १५० विद्यार्थी तीन टेम्पोमध्ये जिल्हा परिषदेत दाखल झाले. प्रारंभी या विद्यार्थ्यांनी जि. प. अध्यक्षा मीनाताई बुधवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंमरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांच्या कक्षात शाळा भरविली. जवळपास ताराभरानंतरही एकही अधिकारी किंवा पदाधिकारी आला नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, अतिरिक्त सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदींच्या कक्षांना कुलूप ठोकले. कक्षामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.
विद्यार्थी जिल्हा परिषदेत आल्याचे समजल्यानंतर खा.बंडू जाधव हेही तातडीने जि.प.मध्ये दाखल झाले. त्यांनी फोनवर सीईओ डुंमरे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी डुंमरे यांनी दौऱ्यावर असल्याचे सांगितले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जि. प. मध्ये पाठवून देतो, असे डुंमरे म्हणाले. त्यानंतरही जवळपास तासभर शिक्षण विभागातील एकही अधिकारी जि.प.त आला नाही. जोपर्यंत शिक्षकांची समस्या दूर होणार नाही, तोपर्यंत जि. प. तच ठाण मांडण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा खा. जाधव यांनी घेतल्यानंतर शिक्षण विभागातील सूत्रे हालली आणि या गावासाठी चार विषयांकरीता तीन शिक्षक नियुक्त केल्याचे लेखी आदेश शिक्षण विभागातील अधिकारी जि. प. मध्ये दाखल झाले. उर्वरित रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी रामपुरीचे सरपंच प्रशांत कागदे, जि. प. सदस्य विष्णू मांडे, गणेश नाईक, गणेश यादव, विशाल यादव, ओमप्रकाश यादव, गजानन यादव, गोपाळ यादव, बालासाहेब यादव आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
बचतपेटी घेऊन विद्यार्थ्यांकडून खणखणाट
जिल्हा परिषदेत पैसे देणाऱ्या शिक्षकांना हवे त्या ठिकाणी बदली करुन दिली जाते. त्यामुळे अडगळीत असलेल्या गावांमध्ये शिक्षक येत नाहीत. परिणामी येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होते. हे सांगण्यासाठी जि.प.त आलेल्या विद्यार्थ्यांनी सोबत बचतपेटी (गल्ला) आणली होती. बचतीचे केलेले पैसे घ्या, परंतु, शिक्षक द्या, अशा घोषणा देत हे विद्यार्थी ग्ल्ल्यांचा खणखणात करताना दिसून आले. याचीच चर्चा दिवसभर जि.प.त होताना दिसून आली.