शिक्षण विभागाला ठोकले कुलूप
By Admin | Updated: June 14, 2016 23:52 IST2016-06-14T23:28:19+5:302016-06-14T23:52:15+5:30
औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश मिळालेली शाळाच जागेवर नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या संतप्त पालकांनी चक्क जि.प. शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजालाच बाहेरून कुलूप ठोकले.

शिक्षण विभागाला ठोकले कुलूप
औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार २५ टक्के जागांवर प्रवेश मिळालेली शाळाच जागेवर नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या संतप्त पालकांनी चक्क जि.प. शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजालाच बाहेरून कुलूप ठोकले. त्यामुळे उपशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील सर्वच कर्मचारी जवळपास पाऊण तास आतमध्ये अडकले. ही घटना आज मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, यासंबंधीची माहिती मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी मोबाईलवरून क्रांतीचौक पोलिसांना कळवली. त्यानंतर तात्काळ पोलिसांचा मोठा ताफा जिल्हा परिषदेत पोहोचला. त्यावेळी शिक्षण विभागाबाहेर कुलूप ठोकणाऱ्या पालकांसह बघ्यांची मोठी गर्दी जमलेली होती. पोलिसांनी कुलूप उघडण्याचे फर्मान सोडल्यानंतर तेव्हा कुठे चार वाजेच्या सुमारास त्या पालकांनी कुलूप उघडले. काही अवधीनंतर शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल तेथे पोहोचले. त्यांनी शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी - अधिकाऱ्यांना सोबत घेऊन क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले व संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली.
प्राप्त माहितीनुसार उदय सोनवणे व रवी गायकवाड यांच्यासह काही पालक सकाळपासूनच जिल्हा परिषदेत आले होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी मोगल यांच्या दालनात जाऊन पालकांनी ‘आरटीई’ अंतर्गत शाळांनी शिक्षण विभागाबरोबरच पालकांचीही दिशाभूल केली आहे, अशा शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी, असा आग्रह धरला. यामध्ये नारेगावच्या एका शाळेचा उल्लेख उदय सोनवणे व गायकवाड यांनी केला. शाळा नोंदणीच्या वेळी नारेगाव येथे शाळा असल्याची नोंद केली; पण जेव्हा २५ टक्के प्रवेशाची यादी जाहीर झाली. यादीत नावे जाहीर झालेल्या पालकांनी प्रवेशासाठी नारेगाव येथे त्या शाळेचा शोध घेतला; पण ती शाळा कुठेही आढळून आली नाही. प्रत्यक्षात ती शाळा अनधिकृतपणे पिसादेवी येथे सुरू आहे. त्या शाळेविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, असा आग्रह धरत पालकांनी शिक्षणाधिकारी मोगल यांना अरेरावी केली. त्यामुळे मोगल हे दालनातून निघून गेले होते. त्यानंतरही ते पालक शिक्षण विभागाबाहेरच थांबून मोगल यांची प्रतीक्षा करत थांबले होते. शेवटी त्यांनी शिक्षण विभागाच्या मुख्य दरवाजालाच बाहेरून कुलूप ठोकले.
बाहेरच्यांची दादागिरी
शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल हे सहकाऱ्यांसोबत क्रांतीचौक ठाण्यात गेले आणि त्यांनी आजच्या प्रकरणात उदय सोनवणे,विलास गायकवाड,अरुण निकाळजे,शुक्लोधन जाधव,दीपक कणसे, रवी जाधव आणि रवी गायकवाड या सातजणांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या सातही जणांना ताब्यात घेतले आहे. बाहेरचे लोक येऊन शिक्षण विभागात नेहमीच वेठीस धरत आहेत, अशा असामाजिक तत्त्वांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणीही मोगल यांनी पोलिसांकडे केली आहे.