मानेगाव प्रा.आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप
By Admin | Updated: May 6, 2015 00:29 IST2015-05-06T00:19:18+5:302015-05-06T00:29:06+5:30
जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे परिसरातील १८ गावांतील ग्रामस्थांना येथून उपचार मिळेनासा झाला आहे.

मानेगाव प्रा.आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप
जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे परिसरातील १८ गावांतील ग्रामस्थांना येथून उपचार मिळेनासा झाला आहे. सतत मागणी करूनही जि.प. आरोग्य विभागातील अधिकारी दखल घेत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारपासून आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले आहे.
या आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी, ३ परिचारिका आणि एक वार्डबॉय अशा सहा जणांचा स्टाफ आहे. परिसरातील १८ गावे आरोग्य सोयीसाठी या केंद्राला जोडण्यात आलेली आहेत. परंतु गेल्या महिनाभरापासून वैद्यकीय अधिकारी केंद्रात हजरच राहत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये जाऊन महागडी सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी शेतात काम करणाऱ्या दोन महिलांवर रानडुकराने हल्ला केला. त्यात दोन्ही महिला जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणले. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नव्हते.
वैद्यकीय अधिकारी नितीन शहा यांच्याशी जखमी महिलांच्या नातेवाईकांनी दुरध्वनीवरून वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. गेल्या तीन दिवसांपासून हे कुलूप कायम आहे. जखमी महिलांना अन्य दवाखान्यात हलविण्यात आले.
मानेगाव येथील आरोग्य सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
या शिष्टमंडळात नितीन भोकरे, रामेश्वर सवणे, सचिन भोकरे, लक्ष्मण जाधव, सुंदर ढेंगळे, कृष्णा पोटरे, निवृत्ती पितळे, संतोष ढेंगळे, कैलास ढेंगळे, कैलास कळकुंबे आदींचा सहभाग होता. ग्रामस्थांनी दुपारपर्यंत कुलूप काढलेले नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)