दहाव्या दिवशी उघडले शाळेचे कुलूप
By Admin | Updated: September 20, 2014 00:03 IST2014-09-19T23:43:42+5:302014-09-20T00:03:45+5:30
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील केंद्रीय कन्या उर्दू शाळेला अखेर एका शिक्षिकेची प्रतिनियुक्ती केल्याने शाळेचे कुलूप उघडले.

दहाव्या दिवशी उघडले शाळेचे कुलूप
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील केंद्रीय कन्या उर्दू शाळेला अखेर एका शिक्षिकेची प्रतिनियुक्ती केल्याने दहा दिवसानंतर आज शाळेचे कुलूप उघडले. ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.
येथील केंद्रीय कन्या उर्दू शाळेत १५१ विद्यार्थी संख्या आहे. एक ते सात वर्गासाठी दोनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते; परंतु शिक्षण विभाग साफ याकडे दुर्लक्ष करीत होता. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला होता. परंतु नुसते आश्वासन देवून पालकांची बोळवण केली होती.
त्यामुळे ९ सप्टेंबरनंतर शिक्षण विभागाला जाग आली व गटशिक्षणाधिकारी शिकारे यांनी येथीलच वस्तीशाळेवर कार्यरत असलेली शिक्षिका नसीमाबानू फारुख अली यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. तसेच कन्या शाळा जि. प. प्राथमिक शाळेवरील शिक्षिका एस. ई. ढोकळे यांची वस्तीशाळेवर प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने आता कन्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दोन्ही शाळेवर नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पालकवर्ग करीत आहे. (वार्ताहर)