ग्लोबल द्राक्ष अवकाळीमुळे ‘लोकल’

By Admin | Updated: March 18, 2017 23:22 IST2017-03-18T23:18:36+5:302017-03-18T23:22:58+5:30

किल्लारी दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रबी बरोबरच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

'Local' due to global grapevine | ग्लोबल द्राक्ष अवकाळीमुळे ‘लोकल’

ग्लोबल द्राक्ष अवकाळीमुळे ‘लोकल’

सूर्यकांत बाळापुरे किल्लारी
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रबी बरोबरच द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील जवळपास ५० एकरवरील विदेशात निर्यात होणारी द्राक्ष आता लोकलच्या बाजारात विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना सर्वात मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील औसा तालुक्यातून द्राक्षांची सर्वाधिक दरवर्षी निर्यात होते. गेल्या तीन वर्षांत दुष्काळामुळे तालुक्यातील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. या संकटातून काही शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी देऊन मार्ग काढीत द्राक्ष बागा जगविल्या. सध्या द्राक्षांची काढणी सुरू असून, निर्यातही सुरू आहे.
दरम्यान, बुधवारी आणि गुरुवारी औसा तालुक्यात गारांचा पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील किल्लारीसह मंगरुळ, नांदुर्गा, येल्लोरी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांमुळे द्राक्षांच्या घडांचे मणी नरम पडून गळाले आहेत. त्याचबरोबर द्राक्षांच्या मण्यांवरील शायनिंगही उडाली आहे. काही बागांमध्ये मण्यांवर रेषा पडून डाग पडले आहेत. त्यामुळे ही द्राक्षे आता बागायतदारांना स्थानिक पातळीवरील बाजारातच विक्री करावी लागणार आहे.
गारांमुळे किल्लारी परिसरातील विनोद बाभळसुरे, विश्वजित पाटील यांच्या प्रत्येकी दोन एकर, बस्वराज बिराजदार, बाबुराव वाडीकर यांच्या प्रत्येकी अडीच एकर तर पांडुरंग चेळकर यांच्या तीन एकर बागेचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील मंगरुळ, नांदुर्गा, येल्लोरी येथील द्राक्ष बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे हे बागायतदार आता चिंताग्रस्त झाले आहेत.
शासनाने पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांकडून केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत पाण्याअभावी तर यंदा गारपिटीमुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

Web Title: 'Local' due to global grapevine