सभापतीपदासाठी ‘लॉबिंग’
By Admin | Updated: March 24, 2017 00:06 IST2017-03-24T00:01:53+5:302017-03-24T00:06:12+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या सत्तास्थानी पोहोचलेल्या युतीमध्ये अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदांसाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरु झाले आहे.

सभापतीपदासाठी ‘लॉबिंग’
बीड : अगदी शेवटच्या क्षणी मतांचा आकडा जुळवत जिल्हा परिषदेच्या सत्तास्थानी पोहोचलेल्या युतीमध्ये अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदांसाठी जोरदार ‘लॉबिंग’ सुरु झाले आहे. युतीच्या सत्तेला ‘हात’भार लावणाऱ्या काँग्रेसच्या एकमेव सदस्यासह शिवसेनेचे युद्धजित पंडित, भाजपचे संतोष हंगे, डॉ. योगिनी थोरात, माजी मंत्री सुरेश धस गटाकडून अॅड. प्रकाश कवठेकर, अश्विनी जरांगे सभापतीपदाच्या स्पर्धेत आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
माजी मंत्री सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांना ऐनवेळी आपल्या तंबूत खेचून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीची सत्तास्वप्ने उधळून लावली. अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार तर उपाध्यक्षपदी शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांची निवड करण्यात आली आहे. पशुसंवर्धन व कृषी विभाग उपाध्यक्षांकडे राहील. समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण, अर्थ व बांधकाम या चार समित्यांसाठी सभापतींची निवड होणार आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजपच्या डॉ. योगिनी थोरात यांचे नाव ऐनवेळी मागे पडले. त्यामुळे त्यांना महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी संधी दिली जाऊ शकते. माजी मंत्री सुरेश धस यांचा टेकू मिळाल्यानेच भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या. त्यामुळे त्यांच्या गटाला एक समिती दिली जाईल. धस समर्थक अश्विनी जरांगे व अॅड. प्रकाश कवठेकर यांची नावे आघाडीवर आहेत. महिला व बालकल्याण किंवा शिक्षण व आरोग्य यापैकी एक खाते धस गटाला दिले जाण्याची शक्यता आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख संतोष हंगे यांनाही निष्ठेचे फळ मिळेल, असे सांगितले जाते. त्यांना समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी संधी देण्याचे ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपाध्यक्षपदाचे दावेदार सेनेचे युद्धजित पंडित यांना आ. लक्ष्मण पवार यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांच्या जागी शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांना ‘लॉटरी’ लागली. त्याचवेळी युद्धजित यांना अर्थ व बांधकाम समिती देण्याचा शब्द पालकमंत्री पंकजा यांनी दिलेला आहे. यापूर्वी उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम खाते असायचे; पण अडीच वर्षांपूर्वी ही प्रथा बंद पडली. काँग्रेसच्या आशा दौंड यांना उपाध्यक्षपद मिळाले; पण त्यांच्याकडील अर्थ व बांधकाम खाते काढून त्यांना पशुसंवर्धन व कृषी खाते दिले होते. यावेळीही उपाध्यक्षांकडे ही दोन खाती कायम राहतील.
तथापि, काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनी अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीत भाजपला साथ दिली. त्याची बक्षिसी म्हणून त्यांनाही सभापतीपदाची ‘लॉटरी’ लागू शकते. शिक्षण व आरोग्य खात्याच्या सभापतीपदाकडे ‘क्रिमपोस्ट’ म्हणून पाहिले जाते. हे खाते पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांनी हायकमांडकडे ‘लॉबिंग’ सुरु केले आहे. पक्ष कोणाला संधी देतो ? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)