५० कोटींच्या कर्जासाठी मनपा पुन्हा तयार

By Admin | Updated: July 1, 2014 00:39 IST2014-07-01T00:36:00+5:302014-07-01T00:39:08+5:30

नांदेड : कोट्यवधींच्या कर्जाचा बोजा डोक्यावर घेतलेल्या महापालिकेने आपल्या मालकीच्या प्रमुख मालमत्ता यापूर्वीच गहाण ठेवल्या

For the loan of 50 crore, | ५० कोटींच्या कर्जासाठी मनपा पुन्हा तयार

५० कोटींच्या कर्जासाठी मनपा पुन्हा तयार

नांदेड : कोट्यवधींच्या कर्जाचा बोजा डोक्यावर घेतलेल्या महापालिकेने आपल्या मालकीच्या प्रमुख मालमत्ता यापूर्वीच गहाण ठेवल्या असून आता रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी ५० कोटींचे कर्ज घेण्याची तयारी चालवली आहे़ कर्ज घ्यावे की नाही, असा वाद आता प्रशासन व पदाधिकाऱ्यात निर्माण झाला आहे़ पदाधिकाऱ्यांनी मात्र कर्ज घेवून विकास कामे सुरू ठेवण्याची मागणी केली आहे़
महापालिका नगरोत्थान व जेएनएनयुआरएमचा उर्वरित निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे़ तर दुसरीकडे खाजगी संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी उत्सूक आहे़ महापालिकेला विविध विकास कामांचा निधी प्राप्त करताना स्वत:चा सहभाग भरावा लागत आहे़ अगोदरच तिजोरीत खणखणाट असलेल्या महापालिकेला आपला वाटा भरण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही़ त्यासाठी काही संस्थांकडे प्रस्तावही सादर केले़ परंतु या संस्थांनी महापालिकेला कर्ज देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे समजते़
नांदेड शहराचा जेएनएनयुआरएम योजनेत समावेश झाल्यानंतर शहरात विविध विकास करण्यात आले़ यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, मल:निसारण आदी कामे करण्यात आले़ योजनेतंर्गत ७३९ कोटींचा निधी मंजूर झाला होता़ यामध्ये केंद्र शासनाचा ८० टक्के, राज्य शासनाचा १० व महापालिकेचा १० टक्के सहभाग आहे़
या योजनेतंर्गत ६९३ कोटी मिळाले असून उर्वरित निधी मिळण्यासाठी योजनेच्या नियमांची पुर्तता करणे आवश्यक आहे़ शहरातील पूर्ण झालेल्या विकास कामांची देखभाल करण्यासाठी मनपाला स्वत:चे उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे़ तसेच मालमत्ता कराची वसुली करणे शंभर टक्के बंधनकारक आहे़ दरम्यान, मागील दोन वर्षात मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही़ त्यामुळे विकास निधीचा पुढील हप्ता मिळण्यास विलंब झाला़ तर आता स्थानिक संस्था कराच्या रूपाने मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे़ त्यामुळे अनेक कामे रखडले़
यासंदर्भात आयुक्त जी़ श्रीकांत म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मागील पाच, सहा वर्षात शहराचा कायापालट झाला़ महापालिकेला जेएनएनयुआरएम, बीएसयुपी घरकुल योजना, नगरोत्थान योनजेतंर्गत कोट्यवधींचा निधीही मिळाला़ परंतु महापालिकेला आता या निधी पोटी लाखो रूपये व्याज द्यावे लागत आहे़
जेएनएनयुआरएमचे दर महिन्याला ८० लाख रूपये व्याज भरावे लागत आहे़ यापूर्वी १२० कोटींचे कर्ज घेतले आहे़ त्याच्या मुद्दलपोटीचा ८५ लाखाचा हप्ता भरावा लागत आहे़ कर्जापोटी दर तीन महिन्याला साडेतीन कोटी रूपये भरावे लागत असून यापुढे कोणती मालमत्ता गहाण ठेवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे़
कर्जबाजारी असलेल्या महापालिकेला उत्पन्नवाढीसोबतच केलेल्या विकास कामांची दुरूस्ती करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे़ उर्वरित विकास कामासाठी एक ते दीड हजार कोटी येणे बाकी आहे़ हा निधी मिळविण्यासाठी महापालिकेला स्वत:चा वाटा अगोदर भरावा लागतो़ जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत त्यासाठी मनपाने वेळोवेळी मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले आहे़
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विकास कामे पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याची मागणी केली होती़ (प्रतिनिधी)

Web Title: For the loan of 50 crore,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.