शहरात लोडशेडिंग अटळ
By Admin | Updated: June 14, 2016 00:12 IST2016-06-14T00:06:56+5:302016-06-14T00:12:40+5:30
औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत

शहरात लोडशेडिंग अटळ
औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत. वीज चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाने शहरात पुन्हा लोडशेडिंग लागू करण्याची तयारी चालविली आहे. परिमंडळ कार्यालयाकडून सध्या तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. परिस्थितीत फारसा बदल न झाल्यास दोन महिन्यांतच लोडशेडिंग लागू करावी लागेल, असे खुद्द महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.
औरंगाबाद शहरात मागील काही महिन्यांपासून वीज गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या हे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये यंत्रणेतील दोषामुळे होणारी हानी आणि वीज चोरी या दोन्हीचा समावेश आहे. चोरी थांबवून वीज गळती कमी करण्यासाठी महावितरण कंपनीने महिनाभरापूर्वी दहा भरारी पथके स्थापन केली. या पथकांनी शहरातील विविध भागांत सुमारे १६० जणांवर दंडात्मक कारवाई केली; परंतु त्यानंतरही गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. सद्य:स्थितीत शहरातील ८४ पैकी केवळ ८ फिडरवरच वीज चोरी नाही. उर्वरित सर्व ७६ फिडरवर वीज चोरी होत आहे.
महावितरण कंपनीच्या धोरणानुसार वीज चोरीचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी लोडशेडिंग लागू केले जाते. त्यानुसार आता परिमंडळ कार्यालयाने औरंगाबाद शहरातही लोडशेडिंग लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तसा प्रस्तावच या कार्यालयाकडून बनविला जात आहे.
याविषयी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, शहरात वीज चोरीचे प्रमाण खूपच अधिक आहे. शिवाय हे प्रमाण जवळपास सर्वच फिडरवर आहे. महिनाभरात आम्ही पथकांमार्फत दीडशेहून अधिक कारवाया केल्या. तरीही वीज चोरी कमी झालेली नाही. त्यामुळे आता आम्ही लोडशेडिंगचा विचार करीत आहोत. तसा प्रस्तावही तयार केला जाणार आहे. वीज चोरी कमी करण्याचा प्रयत्न सध्याही सुरूच आहे. त्याला आणखी गतिमान केले जाईल; परंतु दोन महिन्यांत परिस्थिती बदलली नाही तर लोडशेडिंगची अंमलबजावणी करावीच लागेल. त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय असणार नाही.
महावितरण कंपनीने सहा वर्षांपूर्वी राज्यातील महसुली मुख्यालयाची शहरे भारनियमनमुक्त घोषित केली. तेव्हापासून औरंगाबाद शहरात लोडशेडिंग बंद झाले आहे.
४काही वर्षांपूर्वी शहरात वीज गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या आत होते. मात्र, आता हे प्रमाण ४५ टक्के झाले आहे. त्यामुळे आता भारनियमनमुक्तीपासून पुन्हा एकदा भारनियमन सक्तीचा प्रवास सुरू झाला आहे.
महावितरण कंपनीने महिनाभरात शहरात वीज चोरांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविली. यामध्ये वीज चोऱ्या तर पकडण्यात आल्याच; परंतु त्यासोबतच आतापर्यंत बिलच आकारले जात नसलेले काही ग्राहकही आढळून आले.