खुलताबादेत जय्यत तयारी
By Admin | Updated: July 26, 2014 01:11 IST2014-07-26T00:56:38+5:302014-07-26T01:11:12+5:30
खुलताबाद : येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होत असते.
खुलताबादेत जय्यत तयारी
खुलताबाद : येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील शनिवारी लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्याचबरोबर उद्या शनी अमावास्येला दर्शनाचे मोठे महत्त्व असल्याने मोठी गर्दी होणार असल्याने भद्रा मारुती संस्थानने जय्यत तयारी केली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी असा २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
भद्रा मारुतीच्या दर्शनाला नगर, नाशिक, जळगाव, जालना, धुळे, औरंगाबाद शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहर व परिसरातून रात्री पायी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागतो.
यंदाच्या श्रावण महिन्यासाठी व शनी अमावास्येसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी २० अधिकारी, १५० पोलीस, ३० महिला पोलीस, एक दंगाकाबू पथक, वाहतूक शाखेचे पोलीस, गुन्हे शाखा पोलीस असा जवळपास २०० पोलिसांचा बंदोबस्त शुक्रवारी सायंकाळपासूनच तैनात केला आहे.
पत्र्याचे भव्य शेड
येणाऱ्या भाविकांना पावसापासून त्रास होऊ नये म्हणून मंदिरासमोर पत्र्याचे भव्य शेड उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर पाणी, दवाखाना आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता भद्रा मारुती संस्थानच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
पावसात लांबच लांब रांगा लागतात, त्यामुळे सभामंडपात झिकझॅक पद्धतीने बॅरीकेटस् लावण्यात आल्याने लांब रांगा लागणार नाही, असे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी सांगितले.
स्पेशल दर्शन
भाविकांची गर्दी लक्षात घेता ज्या भाविकांना झटपट दर्शन घ्यायचे आहे, अशा भाविकांसाठी स्पेशल दर्शन ५० रुपये ठेवण्यात आले आहे. (वार्ताहर)
वेरूळच्या घृष्णेश्वर देवस्थानाची बैठक
वेरूळ : रविवारपासून श्रावण मास सुरू होत असल्याने येथील घृष्णेश्वर देवस्थानातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी शुक्रवारी संबंधित अधिकारी व देवस्थान पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नंदकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यावलकर, तहसीलदार बालाजी शेवाळे, घृष्णेश्वर देवस्थानचे अध्यक्ष संजय वैद्य, ग्रामसेवक बी.आर. म्हस्के, महावितरणचे अभियंता, दुकानदार संघटेनेचे गणेश हजारी, मकरंद आपटे, विजय भालेराव आदी उपस्थित होते. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी काही सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने नियोजन करणे सुरू आहे.