लाच मागणारा पशुधन पर्यवेक्षक गजाआड
By Admin | Updated: September 1, 2014 00:46 IST2014-09-01T00:35:35+5:302014-09-01T00:46:03+5:30
लाच मागणारा पशुधन पर्यवेक्षक गजाआड

लाच मागणारा पशुधन पर्यवेक्षक गजाआड
औरंगाबाद : शेळी-मेंढी पालन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याकडे आठ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पशुधन पर्यवेक्षक बाबासाहेब एकनाथ महाशिकारे याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. महाशिकारे हा गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथवडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत आहे.
कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ४० शेळ्या व २ बोकड मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो मंजूरही झाला होता. त्या अनुषंगाने पर्यवेक्षक असलेला बाबासाहेब हा तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतातील शेडची पाहणी करण्यासाठी आला. त्यावेळी त्याने या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. शेतकऱ्याने त्याला होकार तर दिला; परंतु इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून तक्रार दिली.
त्यावरून २५ आॅगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाचलुचपतच्या पथकाने सिद्धनाथवडगाव येथील पशुसंवर्धन कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शेतकरी तेथे पोहोचला. त्याने महाशिकारे याची भेट घेतली. तेव्हा पंधराऐवजी आठ हजार रुपयांमध्ये काम करून देण्यास महाशिकारे तयार झाला. लाचलुचपतच्या पंचांसमक्ष त्याने लाचेही मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून गुन्हा नोंदवून त्याला काल अटक करण्यात आली. महाशिकारेविरुद्ध सिल्लेगाव ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.