दुष्काळाच्या छायेने पशुधन बाजारात
By Admin | Updated: August 13, 2014 00:59 IST2014-08-13T00:30:48+5:302014-08-13T00:59:09+5:30
पाडळसिंगी: दररोज ढग भरभरुन येत असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशात पशुधन जगविण्यासाठी चाराही नसल्याने व

दुष्काळाच्या छायेने पशुधन बाजारात
पाडळसिंगी: दररोज ढग भरभरुन येत असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशात पशुधन जगविण्यासाठी चाराही नसल्याने व पशुखाद्य महागल्याने जनावरे जगवावीत कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्रीसाठी हिरापूर येथील बाजारात आणल्याचे मंगळवारी दिसून आले.
बीड जिल्ह्यातील हिरापूर, नेकनूर, राजेगाव हे जनावरांच्या खरेदी- विक्रीचे मुख्य बाजार आहेत. हिरापूर येथील बाजार पंचेवीस वर्षापेक्षा अधिक काळापासून भरला जात असल्याने येथे जनावरांच्या खरेदी- विक्रीसाठी शेतकऱ्यांसह व्यापारी दूरदूरहून येतात. मंगळवारीही येथील बाजारात मोठी गर्दी दिसून आली.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने होऊन गेले तरी अद्यापही गेवराई तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांकडे हिरवा चारा उपलब्ध झालेला नाही. तालुक्यात दुग्धोत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. त्यामुळे गायी- म्हशी अनेक शेतकऱ्यांकडे आहेत. गेल्या काही दिवसात जरशी गायी पाळण्याचे प्रमाणही मादळमोही, चकलांबा, कोळगाव, तलवाडा, उमापूर या परिसरात वाढले आहेत. तसेच तालुक्यातील जवळपास वीस हजारांपेक्षा अधिक मजूर ऊसतोडणीसाठी जातात. या मजुरांकडेही बैलासह इतर पशुधन आहे. तर काही शेतकऱ्यांकडे शेतीला जोडधंदा म्हणून एखाद दुसरे पशुधन आहे.
पाऊस नसल्याने शेतात हिरवा चारा उगवलेला नाही. त्यामुळे पशुधन घरीच सांभाळावे लागत आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे पुरेसा कडबाही उपलब्ध नाही. परिणामी कडब्याचे दर सध्या तीन ते साडेतीन हजार रुपये शेकडा असे झाले आहेत. या कडबा विकत घेऊन त्यावर पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया तोट्याचे ठरत आहे. तालुक्यात अशी परिस्थिती असल्याने मंगळवारी येथील बाजारात अनेक शेतकऱ्यांनी गाय, म्हैस, बैल आदी पशुधन विक्रीसाठी आणले होते. पशुधनाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही प्रमाणात दरही उतरले होते. यामुळे शेतकरी दोन्ही कडून संकटात आल्याचे शेतकरी रामराव काळे, वसंत पवळ, भीमराव चौरे यांनी सांगितले. (वार्ताहर)