बजेटवर थोडी खुशी थोडा गम..!
By Admin | Updated: July 26, 2014 00:39 IST2014-07-26T00:17:00+5:302014-07-26T00:39:11+5:30
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ९६ प्रमाणे सन २०१३-१४ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१४-१५ चे प्रस्तावित अंदाजपत्रक शुक्रवारी सादर करण्यात आले.
बजेटवर थोडी खुशी थोडा गम..!
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ९६ प्रमाणे सन २०१३-१४ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१४-१५ चे प्रस्तावित अंदाजपत्रक शुक्रवारी सादर करण्यात आले. सकाळी १० वाजता स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री बजेट सादर करण्यासाठी सभागृहात दाखल झाले. मात्र मनपा आयुक्त व महापौर उपस्थित नसल्याने विरोधकांनी आयुक्त आल्याशिवाय बजेट सादर करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने जवळपास एक तास उशिराने स्थायी समितीचे मिस्त्री यांनी प्रभारी महापौर सुरेश पवार यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला.
२०१३-१४ चे सुधारित अंदाजपत्रक व २०१४-१५ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकात घेण्यात आलेल्या विविध योजना व विकास कामांवर सत्ताधारी सदस्यांनी समाधान व्यक्त केले, तर विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. सदरील अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला आहे. याविषयी १५
दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत सभागृहात आलेल्या सुचनेनुसार त्याला मूर्तरुप मिळणार आहे. तत्पूर्वी यावर आनंद व्यक्त करणे योग्य नसल्याचे विरोधी सदस्यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्याक योजना, दलित वस्ती योजना, दलितेत्तर योजना, नाट्यगृह बांधणे, शादीखाना बांधणे, कत्तलखाना उभारणे यासह शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण हाती घेण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात सादर करण्यात आला आहे.
फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन स्थायी समितीचे सभापती राम कोंबडे हे सदरील अर्थसंकल्प सादर करणार होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते सादर करता आले नाही. त्यामुळे नूतन सभापती अख्तर मिस्त्री यांनी राम कोंबडे यांच्या कालावधीतील अर्थसंकल्प शुक्रवारी सभागृहात मांडला. यावेळी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, प्रभारी महापौर सुरेश पवार आदींची उपस्थिती होती.
जुने बजेट रेंगाळले...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे फेब्रुवारी २०१४ रोजी तयार झालेले बजेट सादर करता आले नाही. त्यामुळे तब्बल पाच महिने उशिराने मनपाचे बजेट शुक्रवारी स्थायी समितीच्या सभापतींनी सादर केले.