लिथोट्रिप्सी यंत्र खरेदीला मुहूर्त लागला
By Admin | Updated: November 26, 2014 01:11 IST2014-11-26T00:55:32+5:302014-11-26T01:11:41+5:30
औरंगाबाद : घाटीत लिथोट्रिप्सी यंत्र खरेदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडून निविदा प्रक्रि या सुरू झाली आहे

लिथोट्रिप्सी यंत्र खरेदीला मुहूर्त लागला
औरंगाबाद : घाटीत लिथोट्रिप्सी यंत्र खरेदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडून निविदा प्रक्रि या सुरू झाली आहे. सात वर्षांपासून घाटीतील लिथोट्रिप्सी यंत्र बंद असल्याने मूतखड्याच्या रुग्णांसाठी नवीन यंत्र खरेदी करण्याचा प्रस्ताव सर्जरी विभागाकडून शासनास सादर करण्यात आला होता.
मूतखडा झालेल्या रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. मूतखड्याचा आकार आणि त्याच्या संख्येवरून तो चिरफाड करून काढायचा अथवा लिथोट्रिप्सी यंत्रावर भुगा करायचा याबाबतचा निर्णय सर्जरी विभागातील मूत्ररोगतज्ज्ञ घेतात.
घाटीतील बाह्यरुग्ण विभागात रोज सरासरी दहा ते पंधरा रुग्ण मूतखड्यासंबंधी तक्रार घेऊन येतात. पंधरा वर्षांपूर्वी घाटीत लिथोट्रिप्सी यंत्र स्थापित करण्यात आले होते.
या यंत्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्णांवर उपचार करण्यात आले. परिणामी, यंत्रामध्ये सतत बिघाड होत असे. यंत्राच्या दुरुस्तीवर वारंवार खर्च होई. दरम्यान, संबंधित कंपनीने पाच वर्षांपूर्वी या यंत्राची ट्यूब बदलावी लागेल व ट्यूबचा खर्चही लाखो रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतरही यंत्रात बिघाड होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे हे यंत्र भंगारात काढून नवे यंत्र खरेदी करण्याचा प्रस्ताव घाटी प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांना दिला.
लिथोट्रिप्सी यंत्राची किंमत पाच कोटी रुपये आहे. दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या साहित्य खरेदीचा अधिकार शासनाला आहे. शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी हिवाळी अधिवेशनात लिथोट्रिप्सी यंत्र खरेदीकरिता ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यंत्राची खरेदी ३१ मार्च २०१४ पर्यंत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, एवढ्या कमी कालावधीत आणि घाईगडबडीत यंत्र खरेदी करणे शक्य नसल्याचे प्रशासनाच्या वतीने शासनास कळविण्यात आले. त्यामुळे शासनाने गतवर्षी ती रक्कम दुसरीकडे वर्ग केली. या वर्षी राज्य शासनाने आपल्या अर्थसंकल्पात लिथोट्रिप्सी यंत्रासाठी निधी मंजूर केला.
हा निधी प्राप्त झाल्याने शासनाने यंत्र खरेदीची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मंत्रालय स्तरावर सुरू झालेल्या या खरेदीसाठी घाटीतील सर्जरी विभागातील एक सहयोगी प्राध्यापक नुकतेच मुंबईला जाऊन आल्याचे सूत्राने सांगितले.४
आजही अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया नको वाटते. शस्त्रक्रियेला पर्याय आहे का, असे ते डॉक्टरांना विचारतात. लहान आकाराच्या मूतखड्याचा भुगा लिथोट्रिप्सी यंत्राच्या माध्यमातून करण्यात येतो. त्यानंतर मूतखड्याचे बारीक झालेले कण लघवीद्वारे बाहेर पडतात.
घाटीत सध्या हे यंत्र नसल्याने मूतखड्यावरील उपचार, मोठी शस्त्रक्रिया अथवा दुर्बिणीद्वारे एकटाक्याची शस्त्रक्रिया करून केले जातात. मात्र, ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया नको आहे, असे रुग्ण खाजगी रुग्णालयात जाऊन लिथोट्रिप्सी यंत्रावर उपचार घेतात.