छत्रपती संभाजीनगर : १९ वे अ. भा. विद्रोही मराठीसाहित्य संमेलन येथील आमखास मैदानात मलिक अंबर नगरीत २१, २२ व २३ फेब्रुवारी रोजी होत आहे. आमखास मैदानावर उभारलेल्या मलिक अंबर साहित्यनगरीत २ भव्य सभामंडप असून ३ दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह विविध कार्यक्रम होतील.‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ व ‘बिस्मिल्ला’ या दोन नाटकांसह ६ परिसंवाद, १४ गटचर्चा, १ विशेष व्याख्यान होईल. काव्य पहाट मैफील, गझल संमेलन अशी ४ कविसंमेलने व काही सत्रात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य संवाद होईल. कथाकथनांच्या कार्यक्रमासह २ नाट्यवाचन, ३ एकपात्री प्रयोगासह २ एकांकिकेचे सादरीकरण होईल.
खास मंडपातील ८ कला दालनात चित्रकाव्य, शिल्पकला, सुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, रांगोळी, व्यंगचित्र अशा ८ कला प्रकारांचे लाईव्ह सादरीकरण व प्रदर्शन होईल. ‘संविधान आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ या विषयावरील २ पोस्टर प्रदर्शने भरवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील २०० हून अधिक निमंत्रित साहित्यिक उपस्थित राहणार असून २१ जिल्ह्यांतील ७५ लोकशाहीवादी विचारवंत, अभ्यासक तसेच १० कथाकथनकार आणि ४ इतिहासकार, १५ गझलकार यांच्यासह ३५ नाट्य व सिनेमालिका अभिनेते, एकपात्री नाटककार, एकांकिका नाट्यछटाकार, १२३ निमंत्रित कवींची साहित्यप्रेमींसाठी वैचारिक मेजवानी ठरणार आहेत.
महाराष्ट्रातील वारकरी, महानुभाव, लिंगायत, बौद्ध, आदिधर्म इत्यादी पाच धर्मपीठांचे प्रमुख प्रतिनिधी तसेच २७० लोककलाकारांसह १५ गायक, शाहीर, भीमगीतकार, रॅप कला प्रकारातील ७ युवा कलाकार, बोलीभाषांचे २० अभ्यासक, पत्रकार, चित्रकार शिल्पकार योगदान देत आहेत.
पाच विषयांवर परिसंवाद१) भारतीय जाती व पुरुषप्रधान विषमतेला धर्म आणि संस्कृतीच्या आधारे दूर करता येणे शक्य आहे, २) बोलीभाषा, प्रमाणभाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण, ३) सोशल मीडिया अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन?, ४) अंधकारमय काळात नवे विषय- नवी आव्हाने - नवे लेखन साहित्यिकांशी संवाद, ५) इतिहासाचे विकृतीकरण विरुद्ध सत्य इतिहासकथन या पाच विषयांवरील परिसंवाद होणार आहेत.संमेलनात दहा हजारांवर रसिक, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष इंजि. सतीश चकोर व मुख्य निमंत्रक ॲड. धनंजय बोर्डे यांनी सांगितले.