उत्पादन शुल्क विभागाची जप्त दारू चोरट्यांनी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:03 IST2021-04-10T04:03:56+5:302021-04-10T04:03:56+5:30

औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून दारू तस्करांकडून जप्त केलेला ३५ ते ४० बॉक्स दारूसाठा ...

The liquor seized by the excise department was snatched by thieves | उत्पादन शुल्क विभागाची जप्त दारू चोरट्यांनी पळविली

उत्पादन शुल्क विभागाची जप्त दारू चोरट्यांनी पळविली

औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून दारू तस्करांकडून जप्त केलेला ३५ ते ४० बॉक्स दारूसाठा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. विशेष म्हणजे ही चोरी जेथे झाली, त्या ठिकाणी जवानाचा रात्रंदिवस खडा पहारा असतो. या चोरीचा त्याला सुगावा लागला नसल्याने या घटनेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली.

शासकीय दूध डेअरीमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांचे कार्यालय आहेत. तेथेच भरारी पथकाचे निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्यावर जप्त केलेली देशी विदेशी बनावटीची दारू येथील मुद्देमाल कक्षात जमा करून ठेवला जातो. अनेक वर्षांपासूनचा मुद्देमाल तेथे ठेवण्यात आलेला आहे. मुद्देमाल सांभाळण्यासाठी उत्पादन शुल्कचा जवान (कॉन्स्टेबल ) रात्रंदिवस तेथे तैनात असतो. असे असताना काही महिन्यांपासून तेथून दारूचे बॉक्स चोरी होत आहेत. हे त्या सुरक्षारक्षक जवानाला आणि अन्य अधिकाऱ्यांना दिसले कसे नाही. याबद्दल शंका उपस्थित होत आहे.

गुन्हेशाखेने जप्त केली ७ बॉक्स दारू

गुन्हेशाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाला या चोरीविषयी माहिती मिळाली होती. यानुसार, त्यांनी संशयिताच्या घरावर छापा टाकून देशी दारूचे सात बॉक्स जप्त केले. याविषयी त्याच्याकडे चौकशी केली असता, उत्पादन शुल्क विभागाच्या मुद्देमाल गोडावून मधून हा माल चोरून आणल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, गोडावूनला समोरून कुलूप होते, शिवाय गोडावूनचे पत्र उचकटल्याचे कुठेच दिसत नव्हते. या घटनेची माहिती त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला कळविली. यानंतर, अधिकारी, कर्मचारी खडबडून जागे झाले. गुरुवारी रात्री मुद्देमाल कक्षाचा सुरक्षारक्षक जवान एम.एच. बहुरे हे तक्रार देण्यासाठी क्रांतीचौक ठाण्यात आले. मात्र, तक्रार न नोंदविताच ते परत गेल्याचे पोलिसांनी सांगितले. नेमका किती माल चोरी झाला, हे त्यांना सांगता येत नसल्याचे आणि रात्री ड्युटीवर असताना ते वरिष्ठांसोबत मध्यरात्रीपर्यंत दुसऱ्या कारवाईत होते, असे त्यांनी सांगितले. या दरम्यान ही चोरी झाली असावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: The liquor seized by the excise department was snatched by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.