लायन्सतर्फे प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:40 IST2017-08-25T00:40:50+5:302017-08-25T00:40:50+5:30
देशातील प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना सुरू करण्यात येईल, तसेच जॉगिंगपार्क बनविण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांनी दिली.

लायन्सतर्फे प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशात मधुमेहींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन लायन्स क्लबतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे. येत्या काळात देशातील प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना सुरू करण्यात येईल, तसेच जॉगिंगपार्क बनविण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांनी
दिली.
नागरी सत्कार सोहळ्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, मधुमेहावरील प्रायोगिक प्रकल्प नागपुरात सुरू करण्यात आला आहे. तेथे ३० लाख रुपये खर्च करून व्हॅन घेतली असून, त्याद्वारे गावोगावी जाऊन मधुमेहींची तपासणी केली जात आहे. तेथील यशस्वीतेनंतर टप्प्याटप्प्याने देशातील प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना, जॉगिंगपार्क आदी प्रकल्प सुरू करणार आहोत.
१४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त नवी दिल्ली येथून जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, २१० देशांमध्ये लायन्स क्लबचे कार्य चालते. यात ५ प्रमुख प्रकल्पांवर आम्ही भर देत आहोत. नेत्ररोग, पुस्तक वाटप, पर्यावरण, मधुमेह व लहान मुलांच्या कर्करोगनिदानाच्या संशोधनावर मोठा खर्च करीत आहोत. याद्वारे आम्ही जगभरातील १७ कोटी गरजूंना विविध माध्यमांतून मदत केली आहे.
सुमारे १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२० पर्यंत दरवर्षी जगातील २० कोटी गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्याचे उद्दिष्ट आम्ही ठरविले आहे. या कार्यात मोठ्या प्रमाणात युवाशक्तीला सहभागी करून घेण्यात येणार आहे. लायन्स क्लबमध्ये ५० टक्के महिला असाव्यात यासाठी आम्ही मोहीम हाती घेत आहोत. महिलांनाही समानता, अधिकार मिळावा, त्यांच्यातून नेतृत्वगुण तयार होऊन पुढे यावे, असा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, पूर्वप्रांतपाल महावीर पाटणी यांची उपस्थिती होती.