लायन्स क्लब आॅफ आयकॉन्सने स्वीकारले १५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व
By Admin | Updated: August 31, 2014 00:43 IST2014-08-31T00:22:06+5:302014-08-31T00:43:12+5:30
औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सने १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.

लायन्स क्लब आॅफ आयकॉन्सने स्वीकारले १५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व
औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सने आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचे १० वर्षांसाठी पालकत्व स्वीकारले आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील आयएमए सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सचे अध्यक्ष भास्कर चौधरी, राजेश राऊत, एम.के. अग्रवाल, महावीर पाटणी, तनसुख झांबड, भावेश पटेल, सचिन पहाडे, अजय बजाज, प्रकल्पप्रमुख अमित कुलकर्णी आणि जयदीप घुगे आदींसह लायन्स क्लब आॅफ औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांजवळ गुणवत्ता असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे आपले स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. अशा वेळी त्यांना आर्थिक आधाराची मोठी गरज असते. लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सने १५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. शैक्षणिक क्षेत्राद्वारे भवितव्य घडवू पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पंखांना एका अर्थाने बळ देण्याचे कार्य या संस्थेकडून घडत आहे. लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद आयकॉन्सचा आदर्श घेऊन अनेक सामाजिक संस्था या कार्यासाठी पुढे येतील याची मला खात्री आहे.
अभ्यासक्रमाविषयी बोलताना ना. राजेंद्र दर्डा यांनी विद्यार्थ्यांना नववीपासून व्यावसायिक शिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतला असल्याचे नमूद केले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांसह एका विशिष्ट विषयात पारंगत होऊन आपले भवितव्य घडविता येणार आहे.
येणाऱ्या काळात डीएमआयसीच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने रोजगाराची चिंता न करता मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रारंभी, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयीचे प्रास्ताविक संदीप मालू यांनी केले. त्यानंतर ना. राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते १५१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रवी खिंवसरा, राजेंद्र राजपाल, सी.एस. जरीवाला, रश्मी नायर, संजीव सोनार आदींसह लायन्सचे सदस्य, विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास लंके यांनी केले.