विकृतीची परिसीमा, लहान मुलांना पाहून तरुणाचे विवस्त्र होत अश्लील कृत्य; नागरिकांनी दिला चोप
By सुमित डोळे | Published: October 13, 2023 01:11 PM2023-10-13T13:11:03+5:302023-10-13T13:11:23+5:30
मे महिन्यात देखील याच परिसरात आरोपीने असेच कृत्य केले हाेते. तेव्हा मात्र तो दुचाकीवरून पसार झाला होता.
छत्रपती संभाजीनगर : महिला, तरुणींच्या छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना आता एका विकृताने लहान मुलांना लक्ष्य केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. उद्यान, घरासमोर खेळणाऱ्या छोट्या मुलांना पाहून विवस्त्र होत अनिल सखाराम पिंपळे (२५) हा अश्लील कृत्य करत होता. पाच महिन्यांपासून त्याचे हे प्रकार सुरू होते. सोमवारी ठाकरेनगरमध्ये मुली घाबरून घरी जात रडायला लागताच स्थानिकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
ठाकरेनगरमध्ये सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे लहान मुले घरासमोर खेळत होती. परिसरातील ८ व १० वर्षांच्या मैत्रिणी दुकानात गेल्या होत्या. तेथून घरी परतत असताना धार्मिक स्थळाजवळ अनिल उभा होता. मुलींना पाहताच त्याने अश्लील कृत्य सुरू केले. दोघी प्रचंड घाबरल्या. थरथरत्या अंगाने त्यांनी घर गाठले. काय झाले हे सांगायच्या आधीच बाहेर खेळणाऱ्या मुलांनी अनिलचे ते कृत्य पाहून आरडाओरड करत घराकडे पळ काढला होता. मुलींना धीर देत पालकांनी विचारल्यानंतर शेजारच्यांच्या मदतीने त्यांनी धाव घेत पळण्याच्या तयारीत असलेल्या अनिलला पकडले.
मे महिन्यात हाच होता
संतप्त जमावाने अनिलला चांगलाच चोप दिला. घटना कळताच मुकुंदवाडीचे सहायक निरीक्षक शैलेश देशमुख यांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे देशमुख यांनी सांगितले. मे महिन्यात याच परिसरात अनिलने असेच कृत्य केले हाेते. तेव्हा मात्र तो दुचाकीवरून पसार झाला होता. सिडको चौकातील एका नामांकित रेस्टाॅरंटमध्ये ताे वेटर असून, मूळ जाफराबाद (जि. जालना) येथील आहे.