विजेची तार तुटल्याने राजूर येथे काळोख

By Admin | Updated: April 9, 2015 00:11 IST2015-04-08T23:55:18+5:302015-04-09T00:11:35+5:30

राजूर : मुख्य रस्त्यावरील वीज जोडणीची लोंबकळलेली तार अज्ञात वाहनात अडकून तुटल्याने दि.७ रोजी रात्री १२ वाजेपासून राजूरचा वीजपुरवठा बुधवार सायंकाळपर्यंत बंद पडला होता.

Lightning disrupts darkness at Rajur | विजेची तार तुटल्याने राजूर येथे काळोख

विजेची तार तुटल्याने राजूर येथे काळोख


राजूर : मुख्य रस्त्यावरील वीज जोडणीची लोंबकळलेली तार अज्ञात वाहनात अडकून तुटल्याने दि.७ रोजी रात्री १२ वाजेपासून राजूरचा वीजपुरवठा बुधवार सायंकाळपर्यंत बंद पडला होता. यामुळे ग्रामस्थांना उकाड्यात रात्र जागून काढावी लागली. अचानक तार तुटल्याने सुदैवाने दुर्घटना टळली.
राजूर येथील जालना भोकरदन मुख्य रस्यावरून व्यापाऱ्यानां व्यावसायिक जोडणीचे मीटर दिलेले असून रस्त्यावरून धोकादायक तारा गेलेल्या आहेत. त्यातच कमी उंचीचे खांब असल्याने अनेकवेळा मोठया वाहनांना अडथळा निर्माण होतो. याविषयी महावितरण कंपनीकडे नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करून रस्त्यावरील तारा काढण्याची मागणी केलेली असतांना याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. काल दि.७ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या वाहनाला तार अडकून ती तुटून पडली. अचानक तारा तुटल्याने नागरिकांची भंबेरी उडाली होती. मात्र काहींनी तत्परता दाखवत महावितरण कंपनीच्या कार्यालयात दुरध्वनी करून विजपुरवठा खंडित केला. आज दि.८ रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने रात्रीपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. रस्त्यावरून भाविक जात असतांना वीज प्रवाहाच्या तारा अन्य ठिकाणी पडल्याने सुदैवाने दुर्घटना टळली.
कालपासून नागरिकांना उष्णतेचा सामना करीत रात्र काढावी लागली. सध्या वाढत्या तापमानामुळे जनता हवालदिल झालेली आहे. तसेच संकष्टी चतुर्थी असूनही विजपुरवठा बंद असल्याने शितपेय विक्रेत्यांचे व्यवसाय बंद होते. त्यांना आज दिवसभर विजेअभावी बसून राहावे लागले. पिठाच्या गिरण्याही बंद होत्या. राजूर येथील वीज पुरवठ्याच्या तारा रस्त्यावरून गेलेल्या असून विजेचे खांबही बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे मधोमध आलेले आहेत.
अनेकवेळा वाहने खांबाला धडकून अपघात झालेले आहेत. महावितरण कंपनीने मुख्यरस्यावरील खांब हटवण्यासह जादा उंचीचे खांब अन्य ठिकाणी बसवून रस्त्यावरील तारा काढण्याची मागणी नागरिक, व्यापाऱ्यातून होत आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी येथील वीज उपकेंद्रात सहाय्यक अभियंता सय्यद नासेर हुसेन यांची भेट घेवून राजूरचा वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्यासाठी लोेंबकळलेल्या वीज तारा काढण्यासह विजेचे खांब रस्त्याच्या बाजूला हलविण्याची मागणी केली.
यावर नासेर हुसेन राजूरसाठी स्वतंत्र पाच ट्रान्सफार्मरला मंजुरी मिळालेली असल्याचे सांगून रस्त्यावरील विजेच्या तारा लवकरच काढून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल, असे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Lightning disrupts darkness at Rajur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.