पेटून उठा, रस्त्यावर उतरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:03 IST2017-10-06T01:03:21+5:302017-10-06T01:03:21+5:30
पेटून उठा, रस्त्यावर उतरा... अन्यथा ‘हे लोक’(भाजपवाले) तुम्हाला संपवून टाकतील, असा गंभीर इशारा महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिला.

पेटून उठा, रस्त्यावर उतरा...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पेटून उठा, रस्त्यावर उतरा... अन्यथा ‘हे लोक’(भाजपवाले) तुम्हाला संपवून टाकतील, असा गंभीर इशारा महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिला.
संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करीत होते. तब्बल तासाभराच्या आपल्या भाषणात त्यांनी, जीएसटी, नोटाबंदी, बुलेट ट्रेन, शेतक-यांची कर्जमाफी, बेरोजगारी,सोडून देण्यात आलेला डीएमआयसी प्रकल्प, राज्य सरकारातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार, नरेंद्र मोदी यांची सतत चालू असलेली थापेबाजी, लोकांमध्ये जाऊन करावयाची जागृती या मुद्यांवर सविस्तर विश्लेषण केले.
‘ त्या’ मंत्र्यांना पदावर ठेवू नका...
राज्य मंत्रिमंडळातील प्रकाश मेहता व सुभाष देसाई यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आलेले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या मंत्र्यांना दिली त्या प्रमाणे क्लीन चीट देण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही. त्यांची चौकशी सुरू केली आहे; पण त्यामुळे आम्ही समाधानी नाही. ही चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फतच झाली पाहिजे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत या मंत्र्यांना पदावरून सारले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मांडली.
प्रारंभी, दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर चव्हाण यांचा एका मोठ्या हाराने स्वागत करण्यात आले. डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले. सायंकाळी सहाचा मेळावा रात्री ८.१५ वा. सुरु झाला, तोपर्यंत विविध कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने भाषणे करून नरेंद्र मोदींच्या थापेबाजीवर जोरदार टीका केली. मेळावा सुरूझाल्यानंतर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.एम. शेख, शहराध्यक्ष नामदेव पवार, निरीक्षक संतोष सिंग यांची भाषणे झाली. २०१९ ची तयारी करा, मरगळ झटकून उठा, लोकांपर्यंत पोहोचून नरेंद्र मोदी यांची थापेबाजी कशी सुरूआहे, हे पटवून द्या, बुथ कमिट्या मजबूत करा आणि आगामी सर्व निवडणुका जिंकून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्या, असे आवाहन आ. सत्तार यांनी केले. डॉ. पवन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. मंचावर अनेक मान्यवर, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
एमजीएममध्ये व्याख्यान
दरम्यान, येथील एमजीएम कॉलेज आॅफ जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशनमध्ये ‘राजकारणात नैतिकता शिल्लक राहिली आहे का?’ या विषयावर व्याख्यान झाले.
दररोज नवीन पक्ष येत आहेत. मागील आठवड्यातच राज्यात एक नवीन पक्ष निर्माण झाला. पक्ष निर्माण करणे म्हणजे एखादी सहकारी सोसायटी रजिस्टर करण्यासारखे झाले आहे. नाव ठरविले की झाला पक्ष; परंतु राजकीय पक्षांच्या संख्येवर कुठेतरी कायदेशीर मर्यादा आणली पाहिजे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाव न घेता काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंना टोला लगावला.
यावेळी मंचावर ‘एमजीएम’चे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, डॉ. एच. एस. शिंदे उपस्थित होते. नव्या सरकारने ‘इलेक्शन बाँड’ आणले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी प्रचारात पैसा लागतो. त्यात खरा भ्रष्टाचार आणि नैतिकतेचे मूळ लपलेले आहे. त्यामुळे आधी हा विषय पारदर्शकपणे हाताळण्याची गरज आहे. राजकीय व्यक्तींच्या नैतिकतेबरोबरच माध्यमांची नैतिकता तेवढीच महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.