पुढाऱ्यांचा जीव भांड्यात

By Admin | Updated: September 23, 2014 23:51 IST2014-09-23T23:50:03+5:302014-09-23T23:51:13+5:30

जालना : जिल्ह्यातील महायुतीच्या मातब्बर पुढाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

In the life of the leaders | पुढाऱ्यांचा जीव भांड्यात

पुढाऱ्यांचा जीव भांड्यात

जालना : शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती अभेद्य राहिल, असे दोन्ही मित्रपक्षांच्या श्रेष्ठींनी मंगळवारी मुंबईत जाहीर केल्यामुळे या जिल्ह्यातील महायुतीच्या मातब्बर पुढाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सोमवारी सकाळपासून महायुती तुटणार असे माध्यमातून वृत्त येवून धडकले. पाठोपाठ सोशल मीडियामधून या अनुषंगाने वेगवेगळ्या आशयाच्या क्लिपस् झळकू लागल्या. परिणामी जिल्हास्थानापासून ते खेड्या-पाड्यापर्यंत त्याचे साद-पडसाद उमटू लागले. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांचे चेहरे उजळले. ते लगेचच लगबगीने आपापल्या कार्यक्षेत्रात सक्रिय सुध्दा झाले. परंतू निवडणूक रिंंगणात प्रमुख दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातब्बर पुढाऱ्यांच्या पोटात गोळाच उठला. या मातब्बरांनी तातडीने आपापल्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधला. त्या वृत्ताची खातरजमा केली. पाठोपाठ कृपया युती तोडू नका, अशा विणवण्या सुरु केल्या. युती तुटणे परवडणारे नाही , असेही या मातब्बरांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले. काहींनी तातडीने कार्यक्षेत्रातील दौरे गुंडाळून रातोरात मुंबई गाठली.
श्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या जिल्ह्यातील शिवसेनेचे माजीमंत्री अर्जुन खोतकर, विद्यमान आमदार संतोष सांबरे तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही आपापल्या श्रेष्ठींशी हितगुज करीत काहीही करा, युती टिकवा, असा हट्ट धरला.
मंगळवारी सकाळपर्यंत हे पुढारी कमालीचे बैचेन होते. युती तुटली तर लढतीचे काय चित्र असेल, यासंदर्भात या पुढाऱ्यांनी कानोसा घेतला. एका पुढाऱ्याने तर रातोरात विश्वासू कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. त्यातून मित्रपक्षाचा उमेदवार कोण असेल, मतविभागणी कशी होईल, याचा आढावा घेतला.
मंगळवारी दुपारपर्यंत स्थानिक पातळीपासून ते मुंबई-दिल्लीपर्यंतच्या घडामोंडींवर या पुढाऱ्यांचे बारकाईने लक्ष होते. त्यातच दुपारी उशिरा शिवसेना-भाजपाची युती अभेद्य राहणार, अशी श्रेष्ठींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषणा केल्यानंतर पुढाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: In the life of the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.