आयुष्य सरले,ना मिळाला निवारा...
By Admin | Updated: July 19, 2014 00:45 IST2014-07-19T00:24:18+5:302014-07-19T00:45:26+5:30
भारत दाढेल, नांदेड आयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़ काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़
आयुष्य सरले,ना मिळाला निवारा...
भारत दाढेल, नांदेड
आयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़
काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़ एखादे घऱ मग हे घर उभे करण्यासाठी आयुष्यभर त्याला कष्टच करावे लागते़ परंतु बीएसयुपी योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ शुक्रवारी सांगवी भागातील गौतमनगरातील लाभार्थ्यांना बहुमजली इमारतीत घरकुले वाटप करण्यात आले़ त्यांना चिठ्ठ्या काढून प्लॅटचे नंबर देण्यात आले़ यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता़
सांगवी येथील गौतमनगर भागात उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीत बीएसयुपीच्या २८८ लाभार्थ्यांना यापूर्वीच घरांचे हस्तांतरण करण्यात आले आहे़ झोपडपट्टी निर्मूलन करून बीएसयुपीची उत्कृष्ट वसाहत निर्माण करण्याचे काम करणाऱ्या महापालिकेने आज २४ लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा दिला़ महापालिका इमारतीत स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे नंबर देण्यात आले़ पावसाळा सुरू असल्याने या भागातील लाभार्थ्यांना वेळेवर घरे देण्याचा प्रयत्न बीएसयुपी विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्या पथकाने केला़ मात्र त्यात अडचणी येत होत्या़ उर्वरित लाभार्थ्यांची संख्या अधिक होती़ तर बहुमजली इमारतीत पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या २४ होती़ ४८ घरांची कामे सुरू आहेत़ त्यामुळे कोणत्या लाभार्थ्यांना घरे द्यायचे, हा प्रश्न होता़ अखेर या लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या़ ज्यांना प्लॅटचे नंबर मिळत होते़ त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता़ सभापती पवळे, नगरसेवक अशोक उमरेकर, कार्यकारी अभियंता अंधारे, उपअभियंता प्रकाश कांबळे, वैजनाथ दुनघव, उपअभियंता विश्वनाथ स्वामी, आरसुडे, बंडू उत्तरवार यांनी परिश्रम घेतले़
दोन एकर जागेचा प्रस्ताव रखडला
गौतमनगर येथे आणखी घरकुल उभारण्यासाठी लागणारी अतिरिक्त दोन एकर जागा शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ या जागेचा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वीच दिला असून तो विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे़योजनेचा कालावधी मार्च २०१५ रोजी संपणार आहे़ त्यामुळे ही जागा मिळाल्यास या भागातील लाभार्थ्यांना तातडीने घरकुले देण्याबाबत नियोजन केले आहे़ मात्र या जागेसंदर्भात अद्याप कोणताच निर्णय होत नसल्याने घरकुलांची कामे रेंगाळली आहेत़