2000 रुग्णांना जीवनदायीचा लाभ
By Admin | Updated: August 6, 2014 02:23 IST2014-08-06T02:02:36+5:302014-08-06T02:23:12+5:30
परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़

2000 रुग्णांना जीवनदायीचा लाभ
परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़ या रुग्णांच्या उपचारावर आतापर्यंत ५ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़
राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली़ जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे़ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांबरोबरच अंत्योदय योजनेतील नागरिक जीवनदायी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत़ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबधारकास या योजनेचा लाभ घेता येतो़ जिल्ह्यामध्ये ३ लाख ६० हजार लाभार्थी आहेत़
या योजनेंतर्गत ९७१ आजारांवर दीड लाख रुपयापर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून उपचार केला जातो़ महाराष्ट्र शासनाची ही ऐतिहासिक योजना आहे़ जिल्ह्याबरोबरच राज्यात कुठेही रुग्णाला या योजनेमध्ये उपचार घेता येतात़ परभणी जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबरच करीम हॉस्पिटल, स्वाती क्रिटीकेअर आणि सिद्धी विनायक रुग्णालय या रुग्णालयामध्ये जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो.
परभणी जिल्ह्यातील २ हजार २९८ लोकांनी आतापर्यंत या योजनेत उपचार करून घेतले आहेत़ त्यात कॅन्सर, हृदयविकार यासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांना फायदा झाला आहे़ १० महिन्यांमध्ये या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ जिल्ह्यातील चार केंद्रांवर आतापर्यंत ३३ लाख ३२ हजार रुपयांचे उपचार करण्यात आले आहेत़ त्यापैकी जिल्हा रुग्णालयात ८ लाख ६१ हजार रुपये खर्चाचे उपचार झाले असून, इतर उर्वरित रक्कमेचे उपचार तीन केंद्रांवर झाले.
हृदयविकार, कर्करोग यासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्याची क्षमता गोरगरीब नागरिकांना नसते़ अशा वेळी जीवनदायी आरोग्य योजना या नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहे़ एकूण ९७१ आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जात आहे़ तसेच किडनी बदलण्यासारख्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाखांपर्यंत खर्च शासनाकडून केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)