छत्रपती संभाजीनगर : एकीकडे युरियाचा प्रचंड तुटवडा असताना बाजार सावंगी येथील एक दुकानदार दुकानापासून अर्धा किलोमीटरवरील घरातच युरियाचा साठा करून दीडपट दराने विक्री करत होता. याविषयी माहिती मिळताच कृषीच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी घरावर छापा मारला. युरियाच्या २०३ गोण्या घरात अनधिकृतपणे ठेवल्याचे दिसून आले. या दुकानदाराचा परवाना कायमचा रद्द करणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुकानदाराने त्याच्या ई पास मशीनवर युरिया खताचा साठा शून्य असल्याचे दाखवून घरात साठा केला. २६० रुपयांची युरियाची गोणी ३५० ते ४५० रुपये दराने विकत होता. जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी हरिभाऊ कातोरे आणि पथकाने सोमवारी सायंकाळी संबंधित घरावर धाड टाकली.
रोहित कृषी सेवा केंद्र, कन्नड रोड, बाजार सावंगीचे मालक शेषराव कारभारी काटकर यांचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती कातोरे यांनी दिली. ही कारवाई कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, कातोरे व कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे यांच्या पथकाने केली.