विहिरींची पातळी वाढली
By Admin | Updated: September 12, 2014 00:03 IST2014-09-11T23:57:24+5:302014-09-12T00:03:52+5:30
कुरूंदा : पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने कुरूंदा परिसरात हजेरी लावल्याने अखेर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.

विहिरींची पातळी वाढली
कुरूंदा : पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने कुरूंदा परिसरात हजेरी लावल्याने अखेर विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मे महिन्यात लावलेल्या कापसाची बोंडे संततधार पावसाने खराब होत आहेत. तर शेतात वाढलेले तण काढण्यासाठी मजूरदारांचा शोध घ्यावा लागत आहे.
कुरूंदा परिसरातील बहुतांश शेतीक्षेत्र पाण्याखाली असल्याने ठिबक सिंचनावर मे महिन्यात कापूस व हळदीची लागवड करण्यात आली. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पीके धोक्यात आली होती. पावसाळ्याच्या शेवटी दमदारपणे पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले. संततधार पावसामुळे शेतात तण प्रचंड प्रमाणात वाढले होते. तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजूरदार मिळणे अवघड बनले आहे. पीक परिस्थिती चांगली असली तरी वाढलेल्या प्रचंड तणामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. हे तण काढण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्याअखेर विहिरींची पाणी पातळी वाढल्याने रबी हंगामातील पिकांसाठी आधार ठरणार आहे. त्या बरोबर पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारे, गावठाण तलाव, पाण्याने तुडुंब भरले आहेत. या भागात पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)